आरोपींना पोलिसांनी केले गजाआड
| म्हसळा | प्रतिनिधी |
जिल्ह्याला हेलावून टाकणारी घटना म्हसळा तालुक्यातील कणघर गावात घडली आहे. कणघर गावातील दोन अल्पवयीन मुलांनी घरात एकटी राहणाऱ्या 75 वर्षे वयोवृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिला शेवंती सखाराम भावे यांना आरोपी यांनी तिच्या गळ्यातील व कानातील दागिने चोरी करण्याचे उद्देशाने एकाने हात पकडून व एकाने गळा आवळून जीव घेतल्याचे समजते. आरोपीनी आजीचे 9 ग्रॅम वजनाचे 70 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करून त्यांनी महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. अशा पद्धतीने ठेवून लोकांमध्ये वावरत होते. महिलेचा अंत्यविधी पार पडून चार दिवस उलटून गेले. तेव्हा तिचे दागिने गेले कुठे म्हणुन नातलगांनी शोध घेतला असता वृद्ध महिलेचा खून झाला असल्याचे लक्षात आले. महिलेचा मुलगा सुरेश सखाराम भावे यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप कहाले आणि त्यांचे पोलिस पथकाने शिताफीने शोध घेऊन या प्रकरणात 16 व 17 वर्षाचे दोन अल्पवयीन आरोपींना गजाआड केले आहे. आरोपींवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कर्जत येथील बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. शेवंती भावे यांच्या खून प्रकरणात अधिक शोध घेण्यासाठी म्हसळा पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला कळविले असल्याचे पोलीस निरीक्षक संदिप कहाले यांनी माहिती देताना सांगितले.






