| ठाणे | प्रतिनिधी |
कल्याण पूर्व येथील 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. सदर मुलीला दुकानातून खाऊ घेऊन परतताना गवळी याने जबरदस्तीने उचलून रिक्षात घालून पळवून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी विशाल गवळीसह त्याची पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून आरोपीला तर राहत्या घरातून त्याच्या पत्नीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळीची तीन लग्ने झाली आहेत. तर आरोपीवर चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. विनयभंगासह अनेक गुन्हे दखल असल्याने आरोपीला तडीपार करण्यात आले होते. अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाच्या गुन्ह्यात पत्नीने पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याने आरोपीच्या पत्नीलादेखील अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.