महाराष्ट्रातील चमत्कार दिल्लीत होईल- भुजबळ

मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला. तोच चमत्कार 2024मध्ये दिल्लीत होईल, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुंबईत व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला संबोधित करताना छगन भुजबळ यांनी हे विधान करून राजकीय चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे. संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार 2024मध्ये दिल्लीत होईल. त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन भुजबळांनी केले.
पवारांचं योगदान अतुलनीय
यावेळी भुजबळांनी पवारांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील कार्याचा धावता आढावा घेतला. देशात साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यासह विविध महत्वाच्या क्षेत्रात पवारांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेलं काम जगभरात गाजलं असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम त्यांनी केलं. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे आज देश अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे आज जगभरात अन्न,धान्याची फळांची निर्यात आपण करू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version