पाचपैकी एकच तिकीट खिडकी सुरू
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ रेल्वे स्थानकात परिसरातील बहुसंख्य प्रवासी येत असतात. त्या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नवीन तिकीट घर बांधले आहे. मात्र, बहुसंख्य वेळ त्या ठिकाणी असलेल्या तिकीट घरातील पाच पैकी एकच तिकीट खिडकी उघडी असते. त्यामुळे प्रवासी वर्गातून नेरळ रेल्वे प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
नेरळ रेल्वे स्थानकात दोन फलाट असून मुंबईकडे जाणार्या उपनगरीय लोकल या फलाट क्रमांक दोन वरून जातात. तर, फलाट क्रमांक एक वरून कर्जत, खोपोली आणि पुण्याकडे जाणार्या काही उपनगरीय लोकलची वाहतूक होत असते. या स्थानकावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वेकडून दोन्ही फलाटांवर स्वतंत्र तिकीट घर बांधण्यात आले आहेत. फलाट एकवरून येणार्या प्रवाशांची संख्या कमी असल्याने त्या ठिकाणी असलेले तिकीट घर हे केवळ अर्धा दिवस खुले असते. तर, फलाट दोनवरील प्रवाशांची संख्या पाहता त्या ठिकाणी पाच तिकीट खिडक्या बनविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील केवळ दोनच तिकीट खिडक्या कार्यरत आहेत. ऐन गर्दीच्यावेळी त्यापैकटी एक खिडकी बंद असते. त्यामुळे प्रवासी वर्गाची कुचंबणा होत असून तेथे असणार्या खासगी कियोस्क मशीनच्या फायद्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासन एकच खिडकी चालु ठेवत आहे का, असा सवाल प्रवाशांमधून होत आहे.
