मुख्याधिकार्यांच्या निषेधार्थ कडकडीत बंद
। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्यातील जव्हार हे ऐतिहासिक आणि पर्यटकांना आकर्षित करणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे शंभर वर्षांपेक्षा जुनी नगरपरिषद आहे. मात्र, मिनी महाबळेश्वर संबोधले जाणारे हे शहर अनेक मूलभूत सोयी सुविधांपासून कोसो दूर राहिले आहे. तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे विकासाच्या नावावर बकाल करण्यात आली आहेत. दरम्यान नगर परिषदेच्या या कारभाराच्या विरोधात जव्हारमधील नागरिकांनी प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. तसेच, प्रशासनाने बैठक आयोजित करून त्यातून कुठल्या प्रकारचा मार्ग न निघाल्याने जव्हार नगर परिषदेचे मुख्याधिकार्यांच्या निषेधार्थ नागरिकांनी संपूर्ण जव्हार शहरातील बाजारपेठ यशस्वीपणे बंद ठेवण्यात आली.
पर्यटकांचा ओढा असलेल्या जव्हार शहरात कचर्याची समस्या कायम आहे. अद्ययावत कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची आवश्यकता आहे. कचरा उचलण्याची कार्यक्षम व्यवास्था नसल्याने, जव्हार शहरातील रस्ते आदी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडून दुर्गंधी पसरताना दिसते. जव्हार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या बेजबाबदार आणि अनियोजित कारभारामुळे जव्हार शहरात मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत आहेत. तसेच, नागरी सुविधांचा अभाव आहे, असे सर्व जव्हारवासीयांचे म्हणणे आहे. यावेळी बुधवारी 21 ऑगस्ट रोजी जव्हार शहरातील महात्मा गांधी चौक येथून जव्हार नगरपरिषद कार्यालयावर काळ्याफिती लावून जव्हार शहरातील सामान्य नागरिकांनी ‘नगर परिषद आमच्या हक्काची नाय कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत मोर्चा काढून आपला रोष दाखवून दिला. विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा यात लक्षणीय सहभाग होता.
कामांची सुरूवात झालेली आहे. निवेदनाद्वारे दिलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– माणिनी कांबळे, मुख्याधिकारी, जव्हार नगरपरिषद







