प्रस्तावित वैद्यकिय महाविद्यालयासंदर्भात अपप्रचार; भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली

खा. विनायक राऊत यांच्यावर टीका
महाविकास आघाडीतील नेत्यांनाही केले लक्ष्य

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात प्रस्तावित असणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना खा. विनायक राऊत यांनी प्रस्तावित वैद्यकिय महाविद्यालयासंदर्भात नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी, शासकीय मेडिकल कॉलेजमुळे इथल्या गोरगरीब जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळतील; पण मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक त्या डॉक्टरांची पदेच भरायची नाहीत आणि कॉलेजची परवानगी रद्द झाली की त्याचे खापर राणेंवर फोडायचे, असा अपप्रचार खासदार विनायक राऊत करत असल्याची टीका केली आहे.
एकीकडे शिवसेना नेत्यांकडून भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर आरोपांची टीकास्त्र सोडली जात असताना आता त्यास भाजप नेत्यांकडून प्रत्योत्तर दाखल आरोपांना सुरूवात झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर विविध पक्षांचे परपस्परांविरोधातील वाद चव्हाट्यावर आणल्यामुळे जिल्ह्यात राजकीय तापमान दररोज उच्चांक गाठत असल्याचे चित्र आहे. यातच गेले काही दिवस सेना खा. विनायक राऊत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडेतोड टीका करताना आढळत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर भाजप सिद्ध झाली असून आरोप- प्रत्योत्तरांच्या फैरी झाडल्या जाण्याची संभाव्य स्थिती निर्माण होत आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, ङ्गशासकीय मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. आता डॉक्टरांची सर्व पदांची भरती करणे आणि इतर तांत्रिकी बाबी पूर्ण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. ही सर्व कामे जर पूर्ण असतील आणि कॉलेजला परवानगी नाकारली तर यात राजकारण आले असे समजू शकतो; पण मुळात तुम्ही त्रुटी ठेवणार आणि परवानगी नाकारल्यानंतर त्याचा दोष केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना देणार हे योग्य नाही. राणेंमुळे मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली गेली असेल तर तसे राज्य शासनाने जाहीर करावे. तसेच खासदार राऊतांचे आरोप आम्हाला मान्य नसल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले.
याचप्रमाणे, सिंधुदुर्गमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झाले, तर त्याचा राणेंच्या मेडिकल कॉलेजवर कोणताही परिणाम होणार नाही. वस्तुतः विकास प्रकल्पांना राऊत विरोध करत असल्याने सिंधुदुर्गच्या विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप तेली यांनी या परिषदेत केला.
याशिवाय, रोज पत्रकार परिषद घेऊन आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची मानसिकस्थिती बरोबर नाही. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकही आरोप अथवा भ्रष्टाचार झाला नाही; मात्र आता मलिक हे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत असल्याचे म्हणत मलिकांविरूद्ध निषेध व्यक्त केला. तर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग दौर्‍यात टाळंबा धरणाचे काम वेगाने पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली; पण 1980 साली मंजूर झालेल्या या धरणावर आतापर्यंत 224 कोटी रुपये खर्च झाले; मात्र प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही. धरणातील वास्तव जनतेसमोर येण्यासाठी टाळंबाच नव्हे तर सिंधुदुर्गातील सर्व धरण कामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

Exit mobile version