बोरघाटातील जलद प्रवास लांबणीवर; मुंबई-पुणे अंतर घटणार
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटाला पर्यायी मार्ग म्हणून डोंगर चिरून मिसिंग लिंक तयार करण्यात येत आहे. मुंबई-पुणे अंतर आठ किलोमीटरने कमी, अपघात आणि वीकेंडला होणारी वाहतूक कोंडीची कटकट संपणार असल्याने या मार्गावरून प्रवास करण्यासाठी दोन वर्षांपासून प्रतीक्षा सुरू आहे. 2024 नंतर डिसेंबर 2025 संपले तरी काम अपूर्ण आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाका ते बोरघाट हद्दीत सर्वाधिक अपघात झाले आहेत. यावर पर्याय म्हणून 6695.37 कोटी रुपये खर्ज करून मिसिंग लिंक तयार केला जात आहे. मिसिंग लिंक खालापूर टोलनाका ते थेट लोणावळा हद्दीत सिंहगड कॉलेज असा असणार आहे.
ऑफकॉन कंपनी मिसिंग लिंकचे काम करत असून, नवयुग इंजिनिअरिंग बोगद्याचे काम करीत आहे. मिसिंग लिंकसाठी सह्याद्री पर्वतरांगांतून चावणी गावाच्या हद्दीत वायर लूप पद्धतीच्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाची जमिनीपासूनची उंची 135 मीटर असणार आहे, तर पुलाची लांबी 645 मीटर असणार आहे.
याशिवाय 900 मीटर लांबीचे दोन समांतर पूल असणार आहेत. द्रुतगती मार्गावर तीन पुलांना चौथ्या मार्गिकेत समांतर पूल बांधण्यात येत आहेत. याशिवाय डोंगराच्या पोटातून 150 मीटर खालून दोन समांतर बोगदा आहे.येथील पहिला बोगदा 1.75 किलोमीटर लांबीचा असून, त्याला समांतर बोगदा असणार आहे.
दुसऱ्या बोगद्याची लांबी 8.92 किलोमीटर असून, या बोगद्यालासुद्धा समांतर दुसरा बोगदा असणार आहे. बोगद्याची रुंदी 21. 45 मीटर आहे.
मिसिंग लिंकचे फायदे
सर्वाधिक अपघाताचा टप्पा वगळला जाणार असून, बोरघाटात कायम दरडीचा असलेला धोका मिसिंग लिंकवर नसेल. घाटाचा होणारी वाहतूक कोंडीतून सुटका होऊन अंतर कमी झाल्याने 20 ते 25 मिनिटे जलद प्रवास होणार आहे.






