। नागपूर । वृत्तसंस्था ।
नागपूर पोलीस भरती घोटाळा प्रकरणात नवीन माहिती पुढं आलीय. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. या आरोपींनी हा घोटाळ्यात मिशन 100 राबविलं होतं. पोलीस भरती परीक्षेत डमी उमेदवार बसवून 100 बेरोजगारांना शिपाई बनविण्याची या टोळीचा योजना होती. मात्र, नागपूर पोलिसांना ही योजना हानून पाडली.
नागपूर पोलिसांनी पोलीस भरतीचं रॅकेट उघडकीस आणलंय. हे रॅकेट औरंगाबादच्या ग्रामीण भागात पोलीस भरतीचे कोचिंग क्लासेस चालवत होते. अनेक वर्षापासून रॅकेट सक्रिय असल्याची माहिती आहे. लेखी आणि शारीरिक चाचणी परीक्षेत डमी उमेदवार बसवून हे उमेदवार पास करायचे.
या बदल्यात एका उमेदवाराकडून 13 ते 15 लाख रुपये घेतले जायचे. सीसीटीव्हीमधील हालचालींवर संशय आल्यानं पोलिसांनी हा घोटाळा उघडकीस आणला. या रॅकेटने नागपूरशिवाय पिंपरी, चिंचवड, पुणे, ठाणे यासह इतर ठिकाणी बनवेगिरी केल्याची माहिती आहे. शारीरिक चाचणीत डमी उमेदवाराला स्टेरॉइड द्यायचे, जेणेकरून हे डमी उमेदवार अधिक सक्षमपणे चाचणी द्यायचे आणि पास व्हायचे.
या प्रकरणात पोलिसांनी औरंगाबादच्या जयपाल कंवरलाल, अर्जुन सुलाने आणि तेजस जाधव या तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
या तीन आरोपींना अटक केल्यावर इतर आरोपी भूमिगत झाल्याची माहिती आहे. राज्यातील इतर विभागातील पोलीस भरती आणि विभागामध्ये सुद्धा घोळ झालाय का या दिशेनं पोलीस तपास करताहेत. सखोल तपास केल्यास आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी सारे काही करणारे महाभाग आहेत. पण, यंत्रणा अजूनही सक्षमपणे काम करत असल्यानंच अशाप्रकारची काही प्रकरण उघडकीस येतात.