। चेन्नई । वृत्तसंस्था ।
देशासाठी खेळण्याकरिता सर्वाधिक प्राधान्य देत असलेल्या मिचेल स्टार्कने आता कोणत्या तरी एका प्रकारातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे फ्रँचाईजी लीग क्रिकेट खेळण्याचे दरवाजे त्याच्यासाठी उघडू शकतील. स्टार्क प्रदीर्घ कालावधीनंतर आयपीएलमध्ये खेळला आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धा असल्यामुळे सरावासाठी त्याने यंदा आयपीएलमध्ये खेळण्यास प्राधान्य दिले होते. विशेष म्हणजे, तो पूर्ण आयपीएल खेळला असून कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 यापैकी कोणत्या प्रकारातून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने उघड केले नाही; पण बहुतेक एकदिवसीय क्रिकेटला तो गुडबाय करण्याची शक्यता आहे.
पुढील एकदिवसीय विश्वकरंडक 2027 मध्ये होणार आहे. त्यासाठी तो पुढील तीन वर्षे खेळत राहण्याची शक्यता कमी आहे. या आयपीएलसाठी कोलकता संघाने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये मोजले. आपल्याला मिळालेली ही रक्कम त्याने स्पर्धेत 17 विकेट मिळवून वाजवी ठरवली. यावेळी फ्रँचाईजी क्रिकेटकडे तू या पुढे कसे पाहणार आहेस? या प्रश्नावर स्टार्क म्हणाला, पुढील काही वर्षांत टी-20 क्रिकेटचा मार्ग कसा असेल हे पाहून मी पुढचा निर्णय घेणार आहे. गेली नऊ वर्षे मी ऑस्ट्रेलिया देशाच्या क्रिकेटच्या पलीकडे कोणताच विचार केला नव्हता. शरीराने दुखापतीचे संकेत देताच मी फ्रँचाईसी क्रिकेटमध्ये नोंदवलेले माझे नाव ऐनवेळी पाठीमागे घेतलेले आहे. माझी पत्नीही ऑस्ट्रेलिया संघाची खेळाडू आहे; पण वेळ मिळताच आम्हीही क्रिकेटपासून ब्रेक घेत असतो. आता माझे क्रिकेट उत्तरार्धाकडे आहे. तसेच, पुढील एकदिवसीय विश्वकरंडकही दूर आहे. एखाद्या प्रकारातून निवृत्ती घेऊ शकतो, त्यामुळे मला फ्रँचाईजी क्रिकेट खेळता येईल, असेही तो म्हणाला.