आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

आठ संघ उपांत्यफेरीत दाखल

| मुंबई | प्रतिनिधी |

क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठान व साई क्रीडा मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यफेरीत महिला आणि पुरुषांचे प्रत्येकी चार, चार संघ दाखल झालेले ओत.

स्थानिक महिला गटात राजमाता जिजाऊ, शिवशक्ती महिला, स्वराज्य स्पोर्ट्स, महात्मा गांधी यांनी, तर इन्सोअर कोट(युवा फलटण), भारत पेट्रोलियम, मिडलाईन, आयकर-पुणे यांनी व्यावसायिक पुरुषांत उपांत्य फेरी गाठली. शिवशक्ती विरुद्ध महात्मा गांधी, राजमाता जिजाऊ विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स अशा महिलांत, तर इन्सोअर कोट(युवा फलटण) विरुद्ध आयकर, भारत पेट्रोलियम विरुद्ध मिडलाईन अशा व्यावसायिक पुरुषांत उपांत्य लढती होतील.

कांजूर मार्ग (पूर्व) येथील परिवार मनोरंजन मैदानावरील मॅटवर सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्य पूर्व सामन्यात शिवशक्तीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत ठाण्याच्या होतकरूचा प्रतिकार 38-14 असा सहज संपुष्टात आणला. पहिल्या डावात 2 लोण देत 26-09 अशी आघाडी घेणार्‍या शिवशक्तीने नंतर सावध खेळ करीत आपला विजय साकारला.
दुसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याच्या राजमाता जिजाऊने रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्सचे आव्हान 40-22 असे परतवून लावत विजेत्यापदाच्या दावेदारीत आम्हीपण आहोत हे दाखवून दिले. उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्सने पालघरच्या कुर्लाई मंडळावर 39-09 असा सहज विजय मिळविला. व्यावसायिक पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात इन्सोअर कोट(युवा फलटण)ने मुंबई पोलीस संघाला 48-16 असे सहज नमवित अंतिम फेरीच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले.

पुण्याच्या आयकरने साई सिक्युरिटीचा 35-27 असा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली. भारत पेट्रोलीयमने बँक ऑफ बडोदाचा प्रतिकार 30-14 असा मोडून काढला. दोन तुल्यबळ संघाची लढत रोमहर्षक होईल या अपेक्षेने गर्दी करणार्‍या रसिकांची या एकतर्फी सामन्याने निराशा झाली.

शेवटच्या सामन्यात रायगडच्या मिडलाईनने कोल्हापूरच्या संजय घोडावतला 56-28 असे सहज नमविले. आक्रमक सुरुवात करीत मिडलाईन संघाने संजय घोडावत संघावर पहिला डावातच 2लोण देत 35-11 अशी भक्कम आघाडी घेतली. दुसर्‍या डावात देखील तोच जोश कायम राखत आणखी 2 लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. नितीन धनकड, धीरज बैलमारे यांच्या झंजावाती चढाया व वैभव मोरे याचा भक्कम बचाव यामुळे मिडलाईनने 28 गुणांच्या फरकाने विजय साकारला. संजय घोडावत संघाकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिकार झाला नाही. त्यांच्या सुनील, दर्शन यांची या सामन्यात मात्रा चालली नाही. आज पहिले उपांत्य सामने होतील त्यानंतर अंतिम सामने होतील.

Exit mobile version