सहाणगोठी आदिवासीवाडीचा रस्ता अजूनही भकास
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील आदिवासीवाडीतील रस्त्याच्या कामांचा शुभारंभ आठ महिन्यांपूर्वी महेंद्र दळवी यांनी थाटामाटात केला. प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर साधी खडीदेखील पडली नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आमदारांची जाहिरातबाजी झकास, मात्र आदिवासीवाडीतील रस्ता भकास अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आणून गावे, वाड्यांचा विकास केल्याच्या बतावण्या आमदार दळवी यांनी जाहिरातीच्या माध्यमातून केल्या. प्रत्यक्षात मात्र अनेक गावांचा विकास झाला नसल्याची माहिती यातून उघड होत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत आमदार दळवी यांनी अलिबाग-रोहा रस्त्याचे भांडवल करीत मते मिळविली होती. स्वखर्चाने रस्ता बनवून देईन, असे आश्वासन एका सभेमध्ये दिले होते. प्रत्यक्षात मात्र अलिबाग-रोहा मार्गावरील रस्ता पाच वर्षांत दुरुस्ती करण्यात आमदार अपयशी ठरले असल्याची चर्चा आहे. या रस्त्याचे काम रखडलेले आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे. त्यामुळे आमदारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अलिबाग तालुक्यातील सहाण ग्रामपंचायतीच्या हद्दीत सहाणगोठी आदिवासीवाडी आहे. दोनशेहून अधिक लोकवस्ती असलेलल्या या वाडीतील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन आमदार दळवी यांनी केले. मोठ्या थाटामाटात या कामाचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला होता. आठ ते नऊ महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या या भूमीपूजनाचे काम लवकरच सुरु होऊन पूर्ण होईल, अशी अपेक्षा आदिवासीवाडीतील नागरिकांना होती. परंतु, त्यांची घोर निराशा झाली आहे. भूमीपूजन करून अनेक महिने उलटून गेले आहेत. तरीदेखील या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
रस्त्याच्या कामाची जाहिरातबाजीदेखील मोठ्या प्रमाणात केली होती. विकासकामांच्या जाहिरातीचे फलक लावून मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार केला. परंतु, आमदारांची जाहिरात झकास, मात्र रस्त्याचे काम अजूनही भकास अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. वाडीतील ग्रामस्थांच्या घरांचे काम चालू असल्याने रस्त्याचे काम लांबणीवर गेले होते. परंतु, त्यानंतर ठेकेदाराने या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे सहाणगोठी आदिवासी वाडीतील रस्त्याचे काम कागदावरच राहणार नाही ना, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला ऊतही आला आहे.