आमदार दळवींच्या पत्नीने केली अधिकार्‍याला मारहाण

कायदा हातात घेऊन प्रश्‍न सुटणार नाही; सरकार, शिक्षणमंत्री तुमचेच; तुम्हीच शाळा वाचवा

| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग येथील आरसीएफ स्कूल बंद करण्यात येऊ नये, यासाठी गुरुवारी पालकांनी शिक्षण विभागासह आरसीएफ प्रशासनाच्या अधिकार्‍यांना घेराव घातला होता. अन्याय, हक्कासाठी व्यवस्थेबरोबर भांडलेच पाहिजे. यावेळी विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना मारहाण केली. सत्तेच्या जोरावर कोणी कायदा हातात घेत असेल, तर ते निश्‍चितच निंदनीय आहे. सध्याचे सरकार तुमचे आहे, शिक्षणमंत्रीदेखील तुमचेच आहेत. त्यांच्याकडून शाळा वाचवण्याचे प्रयत्न केल्यास विद्यार्थी आणि पालकांसाठी ते दिलादायक ठरेल, अशी चर्चा अलिबागमध्ये आहे.
दरम्यान, तक्रार देणे अथवा न देणे हा संबंधितांचा अधिकार आहे. परंतु, जी प्रवृत्ती फोफावत आहे, त्याला वेळीच लगाम घालणे गरजेचे आहे. अन्यथा अधिकारी, कर्मचार्‍यांवर अशा मारहाणीच्या घटना घडतच राहतील. जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याआधी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केली नाही, तर त्यांच्यावर अशी वेळ येणार नाही. हेदेखील तितकेच खरे आहे.

आरसीएफ कंपनी सुरु झाल्यानंतर तेथील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कुरुळ वसाहतीमध्ये शाळा सुरु करण्यात आली होती. डेक्कन एज्युकेशन संस्थेने ही जबाबदारी स्वीकारली होती. आरसीएफ कंपनीचे आर्थिक पाठबळ त्यांना मिळत आहे. या शाळेतून बर्‍याच विद्यार्थ्यांचे भविष्य घडले आहे. आरसीएफ कंपनी सुरु होण्यासाठी येथील स्थानिक भूमीपुत्रांनी आपापल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची मुलेदेखील या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आरसीएफने हे उत्तरदायित्व शेवटपर्यंत जपलेच पाहिजे.

अचानकपणे डेक्कन एज्युकेशन संस्थेने शाळेचा कारभार करता येणार नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे शाळा बंद होणार असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. निम्मे शैक्षणिक वर्ष आता संपत आले असताना, शिक्षण उपसंचालकांनी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांचे समायोजन अन्य शाळेत करण्यास सांगितले आहे, तसेच 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म 17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगत आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न झाल्याने पालक संतप्त झाले. जनतेवर अन्याय होत असेल, तर आवाज उठवलाच पाहिजे. त्यामध्ये कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, कायदा हातात घेऊन प्रश्‍न सुटणार नाहीत. ते अधिकच जटील होतील.

गुरुवारी याच विषयासंदर्भात शाळेत बैठक पार पडली. त्यावेळी अधिकार्‍यांना मारहाण झाल्याचा राडा झाला. विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना मारहाण केल्याचे व्हीडीओमध्ये दिसत आहे. गटशिक्षणाधिकारी पिंगळा, शिक्षण विभागातील अशोक कुकलारे आणि सचिन ओव्हाळ यांचा समावेश दिसत आहे. जनतेच्या प्रश्‍नासाठी आवाज उठवणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे, हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे काम आहे. मात्र, ते करत असताना कायद्याची पायमल्ली होत नाही ना, याचेदेखील भान बाळगणे महत्त्वाचे आहे. आपला देश लोकशाहीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतो. त्यामुळे प्रत्येकानेच सद्सद्विवेकबुद्धी जागरुक ठेवून वागले पाहिजे, असे म्हटल्यास चुकीचे ठरु नये.

दळवी यांनी मारहाण केल्यावर पिंगळा यांना चांगलाच राग आल्याचेही दिसत आहे. मात्र, विद्यमान आमदारांच्या पत्नी असल्याने ते काहीच करु शकले नाहीत. याविरोधात ते पोलिसात तक्रार करणार आहेत का, अशी विचारणा कुकलारे यांना केली असता, वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तर, पिंगळा यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही, तर सचिन ओव्हाळ यांनी तक्रार करणार नसल्याचे सांगितले. शिक्षण विभागाने शाळा सुरु ठेवण्याबाबतचा सकारात्मक अहवाल पाठवला आहे. शाळेसंबंधीचा प्रश्‍न न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, तक्रार देणे अथवा न देणे हा संबंधितांचा अधिकार आहे. परंतु, जी प्रवृत्ती फोफावत आहे, त्याला वेळीच लगाम घालणे गरजेचे आहे. अन्यथा अधिकारी, कर्मचार्‍यांवर अशा मारहाणीच्या घटना घडतच राहतील.

Exit mobile version