उद्या होणार आमदार अपात्रता सुनावणी

राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना

| मुंबई | वृत्तसंस्था |

शिवसेनेच्या 16 आमदार अपात्र प्रकरणी राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतरही राहुल नार्वेकर हे याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप होत आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्ली गाठली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे.

दिल्लीला रवाना होण्यापूर्वी राहुल नार्वेकरांनी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. आमदार अपात्रता प्रकरणी दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची मी भेट घेणार आहे. त्याचप्रमाणे हा माझा पूर्वनियोजित दौरा असून आमदार अपात्रता प्रकरणी नवीन वेळापत्रकामध्ये जो काही बदल करायचा आहे, त्याबाबत कायदेशीर सल्ला घ्यायची गरज आहे. त्याप्रमाणे तो सल्ला मी घेईन व लवकरच निर्णय देईन. तसेच राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनाही नोटीस पाठवली आहे. ही अपात्रतेची प्रक्रिया असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

नवे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच राहुल नार्वेकर यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने नवीन वेळापत्रक सादर करताना काय बदल करायचे यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नार्वेकर हे दिल्लीला गेल्याचे बोलले जाते. आधीच नार्वेकर या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. त्यानंतर अध्यक्षांना आता सोमवारी या सुनावणीबाबत सविस्तर माहिती न्यायालयाला द्यावी लागेल. त्याचबरोबर या सुनावणीचे नवीन वेळापत्रकही सादर करावे लागणार आहे.

Exit mobile version