| मुंबई | प्रतिनिधी |
शिळं आणि वास येणारं अन्न दिल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, या कृतीचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे गायकवाड यांनी म्हणत, जीवाशी खेळाल, मी सोडणार नाही, असा इशाराही दिला. दरम्यान, या घटनेचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, संजय गायकवाड यांच्या कृतीबद्दल निषेध व्यक्त केला. मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असे वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली आहे की भाजीला वास येत होता. पण, त्यासाठी मारहाण करणे योग्य नाही. लोकप्रतिनिधीने मारहाण करणे योग्य नाही. याबद्दल सभागृहातील अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांचे वर्तन भूषणावह नाही, यातून सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जाते, असेही फडणवीस म्हणाले.