ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील कामगारांच्या मृत्यूस आ. गोगावले कारणीभूत

स्नेहल माणिकराव जगताप यांचा गोगावलेंवर प्रहार

| महाड | प्रतिनिधी |
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत शुक्रवारी सकाळी कंपनीत स्फोट होऊन झालेल्या अपघातात कंपनीमधील 11 कामगारांचा मृत्यू झाला. या मृत्यूला महाडचे आमदार भरत गोगावले हेच कारणीभूत असल्याचा आरोप महाडच्या माजी नगराध्यक्षा व स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनी शुक्रवारी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुमारास कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये 7 कामगार गंभीररित्या जखमी झाले असून 11 कामगारांचा मृत्यू झाला. या मृत्यूला महाडचे विद्यमान आमदार भरत गोगावले हेच कारणीभूत आहेत.

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू हेल्थकेअर कंपनीचे बांधकाम चालू होते. कंपनी पूर्णत्वास आली नसताना देखील कंपनी चालू करण्यामागे नेमके कोण होते? याचा उलगडा होणे गरजेचे असल्याचे स्नेहल जगताप यांनी सांगितले.

महाड औद्योगिक वसाहत ही रायगड जिल्ह्यात सर्वात मोठी व केमिकल वसाहत म्हणून ओळखली जाणारी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये वारंवार या घटना होत असतात. हे पाहता या ठिकाणी अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा असणे गरजेचे आहे. तसेच राज्य सरकारने महाड एमआयडीसीसाठी स्वतंत्र एनडीआरएफचे स्वतंत्र पथक या ठिकाणी कार्यान्वित ठेवणे गरजेचे आहे. महाडमध्ये एनडीआरएफच्या पथकासाठी राज्य सरकारने दुग्ध शाळेची जागा उपलब्ध करून दिली. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी या ठिकाणी एनडीआरएफच्या बेस् कॅम्पच्या इमारतीचे काम अद्याप का रखडले आहे? असा सवाल त्यांनी शासनाला केला आहे.

महाड औद्योगिक वसाहतीत वारंवार होणाऱ्या घटना पाहता मागील पंधरा वर्षात झालेल्या घटनांमध्ये कामगार सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे कालच्या ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीच्या घटने वरून सिद्ध होत असून कामगारांच्या सुरक्षेचे कोणालाही पडलेले नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे स्नेहल जगताप यांनी सांगितले.

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत झालेल्या घटनेमुळे कंपनी मालक व कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. तसेच या कंपनीमध्ये कागदोपत्री एक उत्पादन व प्रत्यक्षात दुसरे उत्पादन घेण्याचे काम चालू असल्यामुळे व ही कंपनी पूर्ण झाल्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्या अगोदरच कंपनी चालू झाल्याने या कंपनीत 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनेवरून सिद्ध होत आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्या कामगारांना एक कोटी रुपये तर जखमी कामगारांना 50 लाख रुपये देण्याची मागणी स्नेहल जगताप यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने तातडीने अहवाल शासनाला सादर करावा. जेणेकरून भविष्यात अशा घटना कोणत्याही कंपनीमध्ये होऊ नये, यासाठी शासनाला नवीन मार्गदर्शक तत्वे राबवता येतील.

Exit mobile version