अलिबाग-मुरुड आगारातर्फे साळाव पुलापर्यंत लालपरी धावणार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-मुरुड या दोन तालुक्यांना जोडणार्या रेवदंडा-साळाव पुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केले आहे. या पुलावरून पाच टनापेक्षा जास्त वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून एसटी सेवादेखील बंद करण्यात आली आहे. अलिबाग-मुरुडकडे जाणार्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन्ही आगारांनी साळाव पुलापर्यंत एसटीच्या फेर्या सुरु ठेवाव्यात, अशी सुचना आ.जयंत पाटील यांनी एसटी विभागाला केली आहे. त्यानुसार अलिबाग, मुरुड आगाराने साळाव पुलापर्यंत प्रवाशांसाठी एसटी फेर्या सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात आ.जयंत पाटील यांचे पत्र मुरुड आगाराचे व्यवस्थापक सनील वाकचौरे यांना शेकाप तालुका चिटणीस अजित कासार यांनी शनिवारी पत्र सादर केले. यावेळी त्यांच्यासमवेत तुकाराम पाटील, अशोक मिरकुड, रमेश दिवेकर, राहील कडू, श्रीकांत वार्गे, नरेश हिरवे आदी उपस्थित होते. हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद झाल्याने मुरुड आगाराचेही 30 टक्के उत्पन्न घटले आहे. आता निदान साळाव पुलापर्यंत वाहतूक सुरु राहिल्यास प्रवाशांचीही गैरसोय दूर होऊन एसटीच्या उत्पनातही वाढ होणार आहे. दरम्यान, अलिबाग आगारातही अशाच प्रकारचे पत्र सादर करण्यात आले.