जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा; दळवी यांच्यासह चौघांना झाली शिक्षा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी आणि त्यांच्या चौघा साथीदारांना केलेल्या मारहाण आणि शिवीगाळ अंतर्गत प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश विभा इंगळे यांनी 2 वर्षे कारावास आणि रोख रकमेच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर घटना 2013 वर्षामध्ये घडली होती.
याप्रकरणात फिर्यादी असलेले बाबू उर्फ सलीम लालासाहेब दिगी यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार महेंद्र हरि दळवी यांच्यासह अनिल हरिश्चंद्र पाटील, अंकुश द्वारकानाथ पाटील, मनोहर काशिनाथ पाटील, स्वप्नील उर्फ पप्पू दिलीप पाटील, रुपेश रामदास पाटील, अविनाश लक्ष्मण म्हात्रे, मिलिंद द्वारकानाथ पाटील, राकेश रामदास पाटील सर्व राहणार वायशेत, थळ यांच्यावर गुन्हे रजि नंबर सी आर 165/13 नुसार भादंवि कलम 324, 143, 147, 148, 427,504,506 सह 149 नुसार त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायदा 3 (1) (10) (6) आणि मुंबई पोलिस अधिनियम 37 (1) (3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रानंतर याप्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश विभा इंगळे यांच्या न्यायालयासमोर आज झाली. यावेळी अनिल हरिश्चंद्र पाटील, अंकुश द्वारकानाथ पाटील, अविनाश लक्ष्मण म्हात्रे, महेंद्र हरि दळवी या चौघांना दोषी ठरवून भादंवि कलम 324, 149, 147, 148, 504, 506 तसेच 143, मुंबई पोलिस अधिनियम 37 (1) (3) सह 135 या कलमांखाली 2 वर्षे आणि प्रत्येकी एकुण 27 हजार 100 रुपयांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.