तक्रार झाल्यास जूना व्हिडीओ असल्याचे सांगेन
| अलिबाग | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणूकीत भूमीपूजन कार्यक्रम करणे आचारसंहितेचा भंग आहे हे माहिती असतानादेखील आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा नुकताच करण्यात आला. याबाबत दैनिक कृषीवलने आवाज उठवून सदरची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या बातमीने राजकीय वर्तूळात चांगलीच खळबळ उडाली आहे. आमदारांकडून आचारसंहितेचा भंग या मथळ्याखाली होणाऱ्या कृषीवलच्या बातमीची माहिती एका कार्यकर्त्याने आ. दळवी यांना अलिबाग येथील एका कार्यक्रमात दिली. त्यावेळी तक्रार झाल्यास भूमीपूजनाचा व्हिडीओ हा जूना असल्याचे सांगेन, असे दळवी यांनी संबंधीत कार्यकर्त्याला सांगितल्याचे दिसून आले.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी परिसरात निवडणूकीच्या कालावधीत भूमीपुजन करून आचारसंहितेचा भंग आ. दळवी यांच्याकडून करण्यात आला. मात्र, याकडे आचारसंहिता समितीकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. नेमण्यात आलेल्या समितीला काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी करून देखील त्याकडे समितीचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी समितीविरोधात काय भुमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रायगड लोकसभा निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पाडावी. तसेच, आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळया समितीच्या गठीत करण्यात आल्या आहेत वेळोवेळी समितीच्या बैठका घेऊन आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सुचनादेखील केल्या आहेत. मात्र, अलिबागमधील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांचा भूमीपूजन सोहळा शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. निवडणूकीच्या कालावधीत भूमीपुजन करणे आचारसंहितेचा भंग असल्याचे गटविकास अधिकारी दाजी ताईंगडे यांनी स्पष्ट केले आहे. तरीदेखील वेश्वी येथील विकास कामांच्या भूमीपूजन सोहळ्याबाबत कारवाई करण्यास टाळाटाळ का करीत आहेत, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.