पाच वर्षांतील रखडलेली कामे मार्गी लावण्यास उदासीन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
येणार्या काळात निधी प्राप्त करून किनारी पर्यटकांसाठी सज्ज होईल, मुरूडच्या विकासासाठी या परिसरात उद्योग आणणार, दिघी पोर्टचा प्रकल्प जलद गतीने होईल, अशा अनेक आश्वासनांचा पाऊस आमदार दळवी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाडला. करोडो रुपयांचा निधी आणून विकास केल्याच्या बातादेखील आमदारांनी मारल्या. मात्र, मागील पाच वर्षांत मुरूडमधील पर्यटनाबरोबरच येथील तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सोडविण्यात दळवी उदासीन ठरल्याची प्रतिक्रिया अनेक तरुणांनी व्यक्त केली.
मागील पाच वर्षांत सरकारच्या माध्यमातून मुरूडचा सर्वांगीण विकास केला. पर्यटनाला चालना देण्यासाठी किनारी सुशोभिकरण करण्यासाठी सुखसुविधा असाव्यात, त्यासाठी प्रयत्न करणार, मुरूड शहरासाठी 287 कोटींहून अधिक निधी दिला. दहा हजार कोटींहून अधिक निधी ग्रामीण भागासाठी दिला. त्यामुळे या भागात प्रकल्प आल्यास ग्रामपंचायतींचा विकास निश्चित होईल, असे आश्वासन दळवी यांनी दिले. परंतु, करोडो रुपयांचा निधी आणूनदेखील मुरूडमधील अनेक गावे आजही पाण्यापासून वंचित आहेत. येथील तरुणांना रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. मुरूड तालुक्यातील अनेक गावांमधील जलजीवन योजना रखडल्या आहेत. निधीअभावी अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे आमदारांनी आणलेला करोडो रुपयांचा निधी कुठे गेला, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. मुरूड पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. परंतु, येथील पर्यटनवाढीला चालना देण्यास दळवी अपयशी ठरले आहेत. आगरदांडा, रेवस-करंजा, साळाव पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपूर्वीच मंजूर झाले आहे. परंतु, ही कामे आपणच आणली अशा बतावण्या करीत आ. दळवी सर्वसामान्यांची दिशाभूल करीत असल्याचे तेथील स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन तालुक्यातील खाडीमध्ये उभारण्यात येणार्या पुलांचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र, हे पूल उभारताना स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.