| मुंबई | वृत्तसंस्था |
मराठा आरक्षण आंदोलनातं झालेल्या हिंसाचारावरून आता सत्तारूढ आघाडीतील नेत्यांमध्येच धुसफूस सुरु झाल्याचे दिसत आहे. मराठा आंदोलकांनी घराची जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. बीडची घटना म्हणजे गृहखात्याचे पूर्णपणे अपयश आहे. ज्या घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला.
जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे लोक देखील होते. माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे 300 जण आले होते ते तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते, असा खळबळजनक दावा प्रकाश सोळंके यांनी केला. दरम्यान जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा समाजाने आंदोलने सुरु केली आहेत. राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय आमदारांचं मंत्रालयासमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सत्तारूढ पक्षातील आमदार अधिक प्रमाणात दिसत होते. मंत्रालयाबाहेर आमदारांनी वाहतूक रोखली होती . सर्व आमदारांना रस्त्यातून दूर करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी सरकारवर टीका करताना आमदार रोहित पवार म्हणाले, सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात, याचा अर्थ सरकारमध्ये संवाद नाही. चर्चा केल्याशिवाय मार्ग निघणार नाही. सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन त्यात चर्चा करावी. जरांगे यांच्याशी सरकारनं लवकरात लवकर चर्चा करावी, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
एक दोन दिवसात कोणतेही आरक्षण मिळत नसते , कोर्टात ते आरक्षण टिकणारे नसते. घाई गडबडीमध्ये कोणतेही आरक्षण मिळत नाही असे निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगे यांना सांगितले. घाईत घेतलेला निर्णय न्यायालयात टिकणार नाही, अजून काही वेळ द्या, आपल्याला अपेक्षित आरक्षण मिळेल असेही त्यांनी सांगितले. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बी.शुक्रे आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी गुरुवारी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.
राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी एक पेक्षा अधिक संस्था नेमा. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या सर्वेक्षणासाठी चालढकल करु नका. सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवावे. इतर जातींना आरक्षण दिले गेले , मग आम्हाला का नाही?, असा सवाल जरांगेंनी माजी न्यायमूर्तींना केला. त्यावर निवृत्त न्यायमूर्तीं म्हणाले की, मराठे हे मागास असल्याचे सिद्ध झाले नाही , असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु आहे. कायदेशीर बाबी आणि यापूर्वी राहिलेल्या कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील. त्या दूर केल्या जात आहेत. त्यासाठी थोडा वेळ लागेल. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
सरकाराच्या धोरणावर आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली नाराजी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारच्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षण देण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने निराश झालो आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीबेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मनोज जरांगेंचा जीव महत्वाचा आहे. त्यासाठी सरकारने आरक्षणसंदर्भात निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही, असे आमदार जयंत पाटील म्हणाले.
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेची याचिका राज्यामध्ये बीड आणि परिसरात मराठा आंदोलनाने उग्र रुप धारण केलं होतं. अनेक ठिकाणी एसटी बसेस बंद आहेत तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचे आणि जाळण्याचे प्रकार घडलेले आहेत. याच अनुषंगाने गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून याचिकेवर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मराठा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण कोर्टात रद्द ठरवण्यात आले होते.
कुणबी समाजाने मोठे मन करावे ‘मराठा समाजात सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं. मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रसचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी अजित पवारांसह पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. अशातच अमोल मिटकरींच्या नव्या भूमिकेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलन सुरु झाल्यानंतर आमदार मिटकरी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा देखील केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन केलं.