। रेवदंडा । वार्ताहर ।
आमदार होण्यासाठी मतदारसंघातील जनतेला अनेक आश्वासने दिली. सत्तेचा उपभोग घेताना मतदारांचा विसर पडला. आमदारकीची पाच वर्षे आश्वासनांचे गाजर पिकवण्यात आमदारांनी घालवली. आता पुन्हा मतदाराच्या दरबारात आणि पदरात तीच आश्वासने घेऊन जाणार्या आमदारांमुळेच मतदार संघाचा विकास खुंटला आहे. हे जनतेच्या समोर चित्र स्पष्ट झाले आहे. कुठे गेल्या नोकर्या, कुठे गेले कारखाने? आमदार गेले गुवाहाटीला व कारखाने गेले गुजरातला अशी सडेतोड टीका महाविकास आघाडीच्या शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आ. महेंद्र दळवी यांच्यावर केली.
रेवदंडा मोठे बंदर येथील भंडारी समाज सभागृहात महाविकास आघाडीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. या सभेत महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्यासह शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अॅड. गौतम पाटील, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरम कमळाकर साखळे, राजन वाडकर, सदाशिव मोरे, सुरेश खोत, शरद वरसोलकर, ग्रा.पं. सदस्या जयश्री जायपाटील, हेमंत गणपत आदी मान्यवरांसह रेवदंडा व थेरोंडा विभागीय शेकापक्षाचे कार्यकर्त्यां उपस्थिती होती.
महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) व उबाठा गटाच्या पाठिंब्यावर शेकापक्षाच्यावतीने निवडणूकलढवित आहे. महागाईने ग्रासलेल्या माहिला व बेरोजगारीच्या खाईत सापडलेला युवक हे गंभीर प्रश्न महाराष्ट्रासह रायगडला भेडसावत आहेत. अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महायुतीच्या नेत्याने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोकरभरती थांबवून स्थानिक युवकांवर अन्याय केला आहे. गुवाहाटीला जाऊन महायुतीची तिजोरी लुटली. ते हिंदुत्व नव्हे तर, ती चोरी आहे. महायुतीचे सरकार महिलांना सुरक्षित ठेवू शकले नाही तसेच बेरोजगारांना नोकर्या दिल्या नाहीत. अल्पसंख्याक समाज आणि महिलांचे संरक्षण करणे, सन्मान करणे हे कर्तव्य मानते. महाआघाडीच्यावतीने मशिदीवरचा भोंगा व गणपतीचा ढोलसुध्दा वाजवणार असून, यामध्ये कोणी भांडणे लावणार असतील त्यांना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे चित्रलेखा पाटील म्हणाल्या. रेवदंडा येथे अद्ययावत मच्छिबाजार बांधण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.