। महाड । प्रतिनिधी ।
महाड विधानसभा मतदारसंघातून आ. भरत गोगावले यांना पराभूत करत स्नेहल माणिकराव जगताप आमदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत राज्याचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करून दिलेला शब्द पूर्ण केला. हा महिलांचा सन्मान केला आहे, असे उद्गार स्नेहल जगताप यांनी घाटकोपर येथील संवाद मेळाव्या प्रसंगी काढले.
रविवारी सायंकाळी घाटकोपर येथे महाड विधानसभा मतदार संघातील कार्यक्रमाचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, आ. सचिन अहिर, कोकण समन्व्यक विजय कदम, आ. भाऊ कोरगावकर, शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव, शिवसेना प्रवक्ते अनिश गाढवे, दक्षिण रायगड संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड, जिल्हा सह संपर्क प्रमुख बाळकृष्ण राऊळ, दक्षिण रायगड महिला संघटिका डॉ. स्वीटी गिरासे, आरोग्य मदत कक्ष मुंबई प्रमुख कृष्णा कदम, महाड विधानसभा नेते नानासाहेब जगताप, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, युवा सेना समन्व्यक महाराष्ट्र विनीत लाड, उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे, महाड विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे, माणगाव तालुका संपर्क प्रमुख सीताराम मेस्त्री, जिल्हा युवासेना अधिकारी चेतन पोटफोडे, जिल्हा वाहतूक सेना प्रमुख सुभाष मोरे, सह संपर्क प्रमुख महाड विधानसभा चंद्रकांत धोंडगे, महाड तालूका संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख, जिल्हा सह समन्व्यक सोमनाथ ओझर्डे, तालुका प्रमुख आशिष फळसकर, गजानन अधिकारी, अनिल मालुसरे, निलेश सुतार, युवासेना अधिकारी प्रफुल धोंडगे, रणजित मालोरे, यांसह आजी-माजी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना स्नेहल जगताप यांनी महाडच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करताना पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेत स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तसेच गेल्या पंधरा वर्षात महाड तसेच पोलादपूरचा सर्वांगीण विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करत तालुक्यातील प्रलंबित धरण, शिक्षण संस्था, आरोग्य व्यवस्था बळकट करणार असल्याची ग्वाही देत महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या घोषणा दिल्या असता स्नेहल जगताप भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले.