गाजराच्या हारावरुन आमदार भिडले

। मुंबई । प्रतिनिधी ।
विधिमंडळाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जो राडा झाला तो एका गाजराच्या हारावरुन झाल्याचे निदर्शनास आले. कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणं बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी सुरु केली होती. दुसर्‍या बाजूला लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के अशी घोषणाबाजी शिंदे गट आणि भाजपचे आमदार करत होते. या घोषणाबाजीदरम्यान राष्ट्रवादीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारला डिवचण्यासाठी तसेच सरकारचा निषेध व्यक् करण्यासाठी गाजराचा हार आणला. थोड्या वेळानंतर त्यांनी तोच हार गळ्यात घातला आणि त्यांच्यासहित विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरजोरात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. याचवेळी त्यांच्या गळ्यातील हार हिसकावून घेण्यासाठी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले पुढे सरसावले. त्यांनी आमदार पाटील यांच्या गळ्यातील हार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून अनिल पाटील यांच्या मदतीला मिटकरी धावून आले. त्यांनीही अनिल पाटील यांच्याकडेला थांबून जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली.

मग एन्ट्री झाली कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची हार हिसकावण्यासाठी गोगावले, महेश शिंदे-मिटकरी यांच्या अंगावर धावून गेले. परंतु आमदार अनिल पाटील गाजराचा हार सोडायला काही तयार नव्हते. या गोंधळात मात्र दोन्ही बाजूचे आमदार एकमेकांना भिडले. तिथे रोहित पवारही होते. ते देखील सगळा प्रकार पाहून संतापले. त्यांनीही जोरात घोषणाबाजी करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना सुनावलं. मिटकरी यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. महेश शिंदे यांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की केली, त्यांच्याविरोधात अ‍ॅक्शन घ्यावी, त्यांना लगोलग समज देण्यात यावी, अशी मागणी मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Exit mobile version