वडखळ पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी, धक्काबुक्की
| पेण | प्रतिनिधी |
वडखळ पोलीस ठाण्याच्या आवारातच आमदाराच्या भाच्याने धिंगाणा घातला आमदार महेंद्र दळवी यांचा भाचा आहे, असे सांगून आवारातच शिवीगाळी, धक्काबुक्की करीत काही जणांना मारहाण केल्याचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात संजय म्हात्रे यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम म्हात्रेसह सहा जणांना एका गुन्ह्याच्या तपासाकामी वडखळ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी (दि. 4) दुपारी ते पोलीस ठाणे परिसरात हजर झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आरोपीदेखील होते. त्यानंतर आमदार दळवी यांचा भाचा संजय म्हात्रे त्यांच्या गाडीतून पोलीस ठाण्यात आले. तीन मार्च रोजी पालखार गावात दोन गटात झालेल्या भांडणाच्या रागातून संजय म्हात्रे याने समोरील गटातील एका व्यक्तीविरोधात बडबड सुरु केली. वडखळ पोलीस ठाण्याच्या आवारात आमटेम-पालखार येथील दोन गटांमध्ये हाणामारी झाली. आरोपींना पोलीसांचे भय राहिले नाही, कारण यातील आरोपी संजय रघुनाथ म्हात्रे हे आपण आमदार महेंद्र दळवी यांचा भाचा आहे, असं सांगून पोलीस ठाण्याच्या आवारातच शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने विरोधी गटाच्या माणसांना मारहाण केली. हे सर्व कृत्य वडखळ पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, जर लोकप्रतिनीधींचे नाव घेऊन दादागिरी करत असेल, तर हे कृत्य लोकशाहीला बाधकच आहे. याप्रकरणी आमदाराचा भाचा संजय म्हात्रे, कल्पना म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्यासह परशुराम तांबोळी, प्रेम म्हात्रे, राज म्हात्रे, अजय म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, अविनाश म्हात्रे, जयेश भोईर, महेश म्हात्रे, बेबीताई म्हात्रे, पार्वती भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.







