नागावमध्ये चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ
| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
विधिमंडळात आपली बोलती बंद ठेवून काहीही न बोलण्याचा विक्रम विद्यमान आमदारांनी केला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी विधिमंडळाचे आयुध वापरुन कामे होणे गजरेचे होते. परंतु, आमदारांनी गेल्या पाच वर्षांत काय केले, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला. आमदारांच्या न बोलण्यामुळे या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यात ते निष्क्रिय ठरले आहेत, असे टीकास्त्र सोडून आ. दळवींचा चांगलाच समाचार जयंत पाटील यांनी घेतला.
अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताईंच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी (दि. 9) नागाव येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जयंत पाटील पुढे म्हणाले की, मी जेव्हा विधिमंडळात होतो, तेव्हा पूर्ण वेळ सभागृहात बसायचो. आताच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यादेखील विधिमंडळाचे आयुध वापरून सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडतील. आताच्या तरूण पिढीला आपल्या आमदाराने आपले प्रश्न सभागृहात मांडणे अपेक्षित असते. याचबरोबर आमदाराने भेटून समस्या जाणून त्यावर मार्ग काढला पाहिजे. परंतु, याबाबत विद्यमान आमदार निष्क्रिय ठरले आहेत. त्यामुळे न बोलणार्या आमदाराला पुन्हा निवडून देणार का, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.
नागाव येथील श्री सिद्धीविनायक मंदिर आणि वंखनाथ मंदिरात शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, राजू मयेकर, ग्रामपंचायत सदस्य व शेकाप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार दौर्यादरम्यान बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अलिबाग-मुरूड आणि रोहा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई या उच्च शिक्षित आहेत. माझ्यासह अॅड. दत्ता पाटील व माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी या मतदारसंघातील जनतेची सेवा केली आहे. मात्र, आता सर्वच क्षेत्रात अभ्यासपूर्ण अशा महिलेला उमेदवारी दिली आहे.
विधिमंडळात जे बोलायला पाहिजे, जे प्रश्न मांडायला पाहिजेत, ते काम मी केलं आहे. मात्र, यापेक्षा जास्त चित्रलेखा उर्फ चिऊताई करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच विधिमंडळात बोलताना, कार्य करताना प्रत्येक कामकाजाची नोंद होत असते. यामुळे विद्यमान आमदारांनी विधिमंडळात काही न बोलण्याचा विक्रम केलेला आहे. आताच्या तरूण पिढीची अपेक्षा असते की त्यांचे प्रश्न सभागृहात मांडले गेले पाहिजेत. त्यांनी समस्या जाणून यावर मार्ग काढला पाहिजे. तरच त्या आमदाराला मत दिल्याचे सार्थक होईल. न बोलणार्या आमदाराला जनता पुन्हा निवडून देईल का, तर नाही. आताही तेच करायचे आहे. घटक पक्षांसोबतच महिलावर्गदेखील चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागल्या आहेत. जो पक्षाशी गद्दारी करतो, तो मतदारांशी प्रामाणिक कसा राहील, हा विचार करून मतदान करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
टक्केवारी घेणारा आमदार
विद्यमान आमदाराने निवडून आल्यावर खूप काही घेतले. सध्या नागावकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. आताही निधी आणून तो प्रश्न मिटवू शकतो. परंतु, विद्यमान आमदार त्यातही टक्के घेतील आणि आपल्या कामात आडकाठी आणून काम थांबतील. यामुळे अधिकारीदेखील हैरण झालेले आहेत. तसेच, आपण कामाचं पत्र दिलं की आमदाराचे पत्र दाखल होते. यामुळे पाठपुरावा आपण करायचा आणि त्याचे क्रेडिट त्यांनी घ्यायचे, हे पटण्यासारखं नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
पर्यटनाच्या विकासावर भर
काही वर्षात या भागातून जाणार्या रेवस-रेड्डी रस्त्यामुळे येथील पर्यटनात कमालीची वाढ होणार आहे. नागाव हे पर्यटनाचे हब होत आहे. तसेच, येथील पुरातन मंदिरं जी आहेत, तेच नागावचे वैभव आहे. पुढील पाच वर्षांत येथील मंदिरे आणि परिसर चांगला प्रेक्षणीय आणि पर्यटकांचे आकर्षण बनविण्याचा काम आपण करू. यामुळे येथील जनतेच्या रोजगाराचा प्रश्नदेखील लवकर मिटेल. यामुळे येथील पर्यटनाच्या विकासावर जास्त भर देणार असल्याची ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.