शेकाप आ. जयंत पाटील यांनी अतिवृष्टीमुळे रस्ते-पुलांच्या नुकसानाबाबत धरले धारेवर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या लहान मोठ्या पुलासह साकव, मोर्‍या तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानीबाबतचा प्रश्‍न उपस्थित करुन तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीचे प्राप्त प्रस्तावांना निकड, निधी निकषांच्या अधीन राहून मंजूरी प्रदान करण्याचे नियोजन असून रस्त्यांची कामे तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ते वाहतूकीस तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत करण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली.
आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नानुसार राज्यात बहुतांश भागात माहे जुलै, 2021 व माहे सप्टेंबर, 2021 मध्ये वा त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह इतर जिल्हयातील लहान मोठ्या पुलासह साकव, मोर्‍या तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, हे खरे आहे काय, असल्यास, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुल नादुरुस्त झाले आहेत तसेच रस्त्यावरची माती वाहून गेल्यामुळे रस्ते खचले असून काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, हे ही खरे आहे काय, असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, चौकशीनुसार पडलेल्या व नादुरूस्त झालेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणती कार्यवाही केल्याबाबतची माहिती मागितली.
यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तर देताना रायगड जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे पुलांचे व रस्त्यांचे नुकसान झाल्यावे मान्य केले. रायगड जिल्ह्यामध्ये माहे जुलै, 2021 ते सप्टेंबर, 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून लहान मोठ्या पूलासह साकव, मोन्या तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीचे प्राप्त प्रस्तावांना निकड, निधी निकषांच्या अधीन राहून मंजूरी प्रदान करण्याचे नियोजन आहे. रस्त्यांची कामे तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ते वाहतूकीस तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत करण्यात आले असल्याचे सांगितले.

राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी
आ.जयंत पाटील यांचा तारांकित प्रश्‍न

आ. जयंत पाटील यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित करीत राज्यातील किती पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार किती पुल हे धोकादायक स्थितीत असल्याचा सवाल केला. त्यावर एकूण 678 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व सदर स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्राप्त अहवालानुसार राज्यात 08 पुल जड वाहतुकीस धोकादायक असल्याने निदर्शनास आले आहे. तथापि, सद्य:स्थितीत दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने सदर पुलांवरून अवजड वाहतूक धोकादायक असल्याचे पुलांच्या दोन्ही बाजूस सावधानीचा इशारा ( cautionary sign ) दर्शविणारे फलक लावण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सभागृहाला दिली.
आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नानुसार महाड तालुक्यातील (जि. रायगड) सावित्री नदीवरील पुल कोसळून घडलेल्या घटनेमुळे शासनाने राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे संबंधित विभागास निर्देश दिले होते का याची विचारणा केली.
तसेच राज्यातील किती पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार किती पुल हे धोकादायक स्थितीत आहेत. राज्याच्या दळणवळणाच्या क्षेत्रात नद्या आणि ओढ्यांवरील पुलांच्या कोसळण्याच्या दुर्घटना लक्षात घेऊन केंद्रीय महालेखापालांनी पुलांचे सर्वेक्षण केले आहे. सदर केलेल्या सर्वेक्षणात सन 2016 मध्ये राज्यात असणार्‍या पुलांच्या संख्येतील दुरुस्तीसाठी प्रतीक्षेत असणारे 2 हजार 635 पुलापैकी केवळ 363 पुलांची डागडुजी करण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. राज्यातील सुमारे 2 हजार 272 पुलांच्या दुरुस्त्या प्रलंबित असून या पुलांव्यतिरिक्त 300 हून अधिक पुलांची मुदत संपली आहे तर 250 हुन अधिक पुलांवरून वाहतूक करणे धोकादायक ठरत असल्याचा उल्लेखही आ. जयंत पाटील यांनी केला. त्याचप्रमाणे राज्यातील धोकादायक स्थितीत असलेल्या पुलांच्या दुरुस्तीबाबत शासनाकडून कोणती उपाययोजना वा कार्यवाही करण्यात आली वा येत आहे. तसेच शासनाने पुलांवरील प्रवास सुरक्षित होईल व दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने कोणती उपाययोजना केली वा करण्यात आली आहे,
या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी महाड सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घ टनेच्या अनुषंगाने दिनांक 19 ऑगस्ट, 2021 च्या शासन परिपत्रकाद्वारे सा.बां. विभागाच्या अखत्यारीतील पुलांचे नियतकालिक परिरक्षण करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यात एकूण 678 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व सदर स्ट्रक्चरल ऑडिटच्या प्राप्त अहवालानुसार राज्यात 08 पुल जड वाहतुकीस धोकादायक असल्याने निदर्शनास आले आहे. तथापि, सद्य:स्थितीत दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने सदर पुलांवरून अवजड वाहतूक धोकादायक असल्याचे पुलांच्या दोन्ही बाजूस सावधानीचा इशारा (cautionary sign) दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत. महालेखाकार यांचेकडून सन 2018-1 मध्ये पुलांचे निष्पादन लेखापरीक्षा करण्यात आले आहे. सदर लेखापरीक्षा अहवाल सन 2020 मध्ये प्राप्त झाला आहे. महालेखाकार यांचेकडून सन 2018-19 मध्ये पुलांचे निष्पादन लेखापरीक्षा अहवालात नमूद केलेली पुल दुरुस्ती संदर्भातील स्थिती ही सन 2016 मधील असून सद्य:स्थितीत आवश्यकतेनुसार पुलांची दुरुस्ती करण्यात आलेली असून सद्य:स्थितीत पुल वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यात आलेले असल्याचे स्पष्ट केले.

Exit mobile version