आ. जयंत पाटील यांनी अनुभवला मिनी ट्रेनचा प्रवास

| माथेरान | संतोष पेरणे |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन माथेरान येथे करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी माथेरानला भेट दिली. यावेळी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा मिनी ट्रेनने प्रवास केल्याचे सांगत मिनी ट्रेनमधून केलेल्या सुखद प्रवासाचा अनुभव सांगितला.


यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे तसेच बँकेचे पदाधिकारी व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले कि, माथेरानच्या पायथ्याशी माझा जन्म झाला. मात्र 67 वर्षाचा झाल्यावर मिनी ट्रेनमध्ये बसण्याचा योग आला. इतक्या वर्षात पहिल्यांदा मिनी ट्रेनमधून प्रवास करावा लागला, यासाठी स्वतःलाच कमनशिबी समजतो. माथेरानच्या पायथ्याशी असलेले नेरळजवळील भडवळ हे मामाचे गाव आहे. तेथे जन्म होऊनही वयाच्या 67 वर्षापर्यंत माथेरानला अनेकदा भेट दिली मात्र मिनी ट्रेनमधून प्रवास केला नव्हता. सध्याच्या धावपळीच्या युगात आणखी कार्यक्रमाला जायचे असल्याने मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याचा योग आला, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माथेरान भेटीवर आलेले आ. जयंत पाटील यांनी प्रथमच नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनच्या शटल सेवेतून माथेरान शहरात प्रवेश केला. मिनी ट्रेनमध्ये अमन लॉज स्थानकातून प्रवास सूरु केल्यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

केंद्र सरकारवर निशाणा
नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन शटल सेवेतून प्रवास केल्याने मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. प्रवास करताना अनेक गोष्टी समजल्या. या ट्रेनला देशाच्या रेल्वेच्या इतिहासात सर्वोच्य स्थान मिळायला हवे होते. पण आजही ट्रेन हवी तशी परिपूर्ण झालेली दिसून येत नाही. नेरळ माथेरान मिनी ट्रेनमधील बदलाबाबत, सुविधांबाबत विधिमंडळात अनेकदा आवाज उठवला. मात्र केंद्र सरकार काहीही करताना हे सरकार दिसत नाही, असा टोलाही यावेळी आ. जयंत पाटील यांनी दिला.
फोटोसाठी गर्दी
मिनी ट्रेनमधून प्रवास करीत असताना अनेक प्रवाशांनी कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नाही, असा कोण आमदार आहे, हे पाहण्यासाठी अमन लॉज स्थानकात गर्दी केली होती. साधी राहणीमान पाहून अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. याचवेळी नागोठणे येथील प्रवासीही या ट्रेनमधून प्रवास करीत होते. त्यांनी आ. जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली.
Exit mobile version