| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूरसारख्या छोट्या शहरातील जनसेवा प्रतिष्ठान संचलित प्रभावती रा. शेठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविताना दिसून येत आहेत. असे असताना महाड मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने ज्याप्रमाणे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील अनेक शाळांना मदतीचा हात दिला, त्याप्रमाणेच या शाळेच्या प्रगतीसाठीही निश्चित सहकार्य करू, अशी ग्वाही ‘एमएमए’चे अध्यक्ष अशोक तलाठी यांनी प्रमुख अतिथी म्हणून दिली.
शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना अशोक तलाठी बोलत होते. सोबत एमएमएचे खजिनदार व पोलादपूर नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक संतोष चव्हाण, उपनगराध्यक्ष नागेश पवार, नगरसेविका अंकिता निकम, नगरसेविका श्रावणी शहा, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र जाधव, मुख्याध्यापक विकास मांढरे, सिध्दीविनायक बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका भोसले, शैलेश तलाठी, सचिन शेठ, सचिन मेहता, पत्रकार वृषाली पवार, प्रशांत गांधी, माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, एकनाथ कासुर्डे आणि शिंदे शिवसेना शहरप्रमुख सुरेश पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलींद शहा यांनी भुषविले.
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून करण्यात आले. यावेळी शाळेतील क्रीडा व शिक्षण तसेच विज्ञान प्रदर्शनातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष नागेश पवार, सचिन मेहता तसेच अन्य मान्यवरांनी मनोगतं व्यक्त केली. यावेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष मिलिंद शहा यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेताना विविध विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश याबद्दल विशेष प्रशंसा केली. यावेळी अजय येरूणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यानंतर विद्यार्थी, विद्यार्थिनींचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले.