लहान झाडांना बांधले झेंडे; पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी
| महाड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोमवार, दि. 9 मार्च रोजी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगत लावण्यात आलेल्या पक्षाच्या मोठ मोठ्या झेंड्यांमुळे लहान झाडांना धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली असून, पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी महाड-रायगड महामार्गालगत अनेक ठिकाणी मनसेचे मोठे झेंडे लावण्यात आले आहेत. मात्र, हे झेंडे रस्त्याच्या कडेला नुकतीच लावण्यात आलेल्या लहान रोपांना आणि त्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळीला बांधण्यात आल्याचे दिसून येत आहे. झेंडे सतत वाऱ्यामुळे फडकत असल्याने त्याचा ताण थेट या झाडांवर येत असून, त्यामुळे रोपे वाकण्याची किंवा तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामार्ग रुंदीकरणाच्या वेळी या मार्गावरील अनेक मोठ्या वृक्षांची तोड करण्यात आली होती. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेत असल्याचे सांगत त्याठिकाणी नव्याने अधिक प्रमाणात झाडे लावली जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर या मार्गालगत मोठ्या प्रमाणात रोपे लावण्यात आली होती. मात्र, आता वर्धापनदिनाच्या निमित्ताने झेंडे लावण्यासाठी या नव्याने लावलेल्या रोपांचा आधार घेतल्यामुळे त्यांना धोका निर्माण झाल्याची टीका होत आहे. झेंडे फडकताना झाडे सतत हलत राहिल्यास त्यांच्या मुळांवर परिणाम होऊन ती सुकण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात अक्षरा ढाके जगताप यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, महामार्ग विभागाकडून झेंडे लावण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. या प्रकरणाची माहिती घेऊन संबंधितांशी चर्चा करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, झाडे वाचवण्याच्या मुद्द्यावर आवाज उठवणाऱ्या संघटनांनीही या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षानेच अशा प्रकारे झाडांना हानी पोहोचेल अशा पद्धतीने झेंडे लावणे कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.







