| डोंबिवली | प्रतिनिधी |
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत यांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत या मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई कला मंदिर नाट्यगृहात कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याच अहवालाचे पोस्टर व्हायरल झाले असून, या पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटोसुद्धा लावण्यात आला आहे. तर जी प्रेसनोट काढण्यात आली, त्यात मात्र मनसे पक्षाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मनसे श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देणार का, हा सवाल उपस्थिती केला जात आहे.
दरम्यान, खासदार शिंदे यांच्या अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यावर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देत सांगितले की, डोंबिवलीत विकास तर काय झालेला दिसत नाही. कार्य अहवालात विकास कोणता दाखवतात ते अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतरच त्यावर भाष्य करेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे दरेकर यांनी खासदार शिंदे यांना डिवचल्याचं बोललं जात आहे.