। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतमधील खांडा गावातील रस्त्याच्या कडेला असलेली कचराकुंडी तेथील ग्रामपंचायतचे माजी सदस्याने कंत्राटी कामगार घेवून तोडून टाकली आहे. दरम्यान, तेथे असलेल्या पाणीपुरीवाल्यासाठी ग्रामपंचायतीने आर्थिक निधी खर्च करून बांधलेली कचराकुंडी तोडली असून पुन्हा त्याच ठिकाणी कचराकुंडी उभारली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा मनसेचे नेरळ शहर उपाध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी दिला आहे.
दोन वर्षापूर्वी नेरळ ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी खर्च करीत नेरळ गावात विविध भागात कचरा कुंड्या सिमेंट वीट बांधकाम करून बांधल्या होत्या. त्यातील खांडा गावातील कचरा कुंडी येथील माजी सदस्य हे आपल्या कंत्राटी कामगार यांना सोबत घेऊन तोडत होते. गणेश उत्सव सुरू असताना कचराकुंडी तोडली जात असल्याने स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी कचराकुंडी कशासाठी तोडली जात आहे, अशी विचारणा केली असता नव्याने बांधण्यासाठी तोडली जात असल्याचे सांगितले. मात्र त्या ठिकाणी असलेल्या पाणीपुरीवाल्याला या कचराकुंडीचा त्रास होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय करीत कचराकुंडी तोडण्यात आली. कचराकुंडी तोडण्यासाठी कामगार आणणारे माजी सदस्य हे आता ग्रामपंचायत सदस्यदेखील नाहीत. संबंधित कचराकुंडी तोडण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी दिलेली नाही.
तरीदेखील एका पाणीपुरीवाल्याला खुश करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय करून कचरा कुंडी तोडली आहे. त्यास स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी विरोध केला असून पुढील आठ दिवसात त्याच ठिकाणी नव्याने कचराकुंडी बांधण्यात यावी आणि नवीन कचराकुंडी बांधण्यासाठी आलेला खर्च हा चांगल्या स्थितीत असलेली कचराकुंडी तोडण्यासाठी कामगार लावणार्या माजी सदस्यांकडून वसूल करावा अशी मागणी केली आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडे दिलेल्या निवेदनात ही मागणी केली असून उपोषणाचा इशारा दिला आहे.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कोणालाही ती कचराकुंडी तेथून हलवून देणार नाही. ग्रामपंचायतीला त्या तोडण्यात आलेल्या कचराकुंडीबद्दल कोणतीही माहिती नसल्याने ग्रामपंचायत मालकीची कचरा कुंडी तोडणार्या व्यक्तीवर नेरळ ग्रामपंचायतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा.
– सुभाष नाईक, ग्रामस्थ