सिडको अधिकाऱ्यांना विचारला जाब
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली वसाहतीत मागील काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याने आक्रमक झालेल्या मनसेच्या महिला आघाडीने सिडको कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा सचिव स्नेहल बागल यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको कार्यालयाला धडक देत कळंबोलीवासियांच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार आहे का, असा सवाल यावेळी बागल यांनी सिडको अधिकाऱ्यांना विचारला.
दरम्यान, त्यांनी सोबत आणलले गढूळ पाण्याचे बाटल्या अधिकाऱ्यांना देऊन पाणी किती घाण येत आहे हे दाखवून दिले. सिडकोने विकसित केलेल्या कळंबोली वसाहतीला सिडकोकडून पाणीपुरवठा केला जातो. पण, सिडकोच्या दिशाहीन व्यवस्थापनामुळे नागरिकांना गेली आठवडाभर गढूळ पाणी प्यावे लागत आहे आणि हे गढूळ पाणी प्यायल्यामुळे याचा विपरीत परिणाम कळंबोलीवासीय गेले काही दिवस अनेक आजाराला सामोरे जात आहेत. आधी सिडकोकडून या वसाहतींना सर्व सुविधा पुरविल्या जात होत्या. पण, सिडकोच्या वसाहती या पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर सिडकोने सुविधा पुरविण्याबाबत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे सिडकोने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी बागल यांनी केली आहे. यावर लवकरच तोडगा काढावा, असेही सांगण्यात आले आहे. यावर सिडको अधिकारी प्रफुल देवरे यांनी एमजेपीला पाण्याचे नुमने पाठवून याची पाहणी करण्यास सांगतो, असे सांगितले.