। गोंदवले । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार सातारा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी मनसेचे इंजिन सुसाट झाले आहे; परंतु माढा मतदारसंघात मात्र, सातारा जिल्ह्यातील मनसेची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभेच्या माढा मतदारसंघाबाबत देशात आणि राज्यात चर्चा आहे. माढा मतदारसंघाची निर्मिती झाल्यावर पहिल्यांदाच येथून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडून गेले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ देशपातळीवर लक्षवेधी ठरला. यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघावर सर्वांचे लक्ष आहे.
या वेळी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन्हीही पक्षांचे मित्रपक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्हाड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेऊन मनसेने शक्तिप्रदर्शन केले; परंतु, मनसे माढा मतदारसंघात अद्याप चार्ज न झाल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. विधानसभेच्या माण-खटाव व फलटण मतदारसंघांत मनसेचे सुमारे अठरा ते वीस हजार मतदार असल्याचा दावा पदाधिकारी करत आहेत; परंतु, अद्यापही माढ्यात मनसेने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने ही हक्काची मते नेमकी कुणाच्या पारड्यात पडणार? याबाबत चर्चा सुरू आहे.