जिल्हा शिक्षणाधिकार्यांचे भेटीचे लेखी पत्र
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गैरकारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांची अक्षम्य हेळसांड होत असून, याप्रश्नी प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उत्स्फूर्त ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी येत्या 17 जानेवारी रोजी संबंधित समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी भेट देणार असल्याचे लेखी पत्र मनसे पदाधिकार्यांना दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी नव्या वर्षामध्ये विद्यार्थी व पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी मनसैनिक सज्ज झाले आहेत, अशी माहिती तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाअध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी दिली.
पोलादपूर तालुक्यातील 2021 च्या साखर सुतारवाडीतील भूस्खलनावेळी मयत झालेल्या दोन विद्यार्थिंनींच्या पालकांना कोणत्याही प्रकारचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत शिक्षणविभागाने कार्यवाही न केल्याने तसेच अन्य एका विद्यार्थिनीला सातवी इयत्तेमध्ये असूनही शैक्षणिक नोंदीअभावी पुन्हा पाचवी इयत्तेमध्ये शिकण्यास सांगण्यात आल्याच्या दोन प्रमुख मुद्दयांसह अनेक शैक्षणिक समस्यांची जंत्री यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाअध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी तसेच मनविसेच्या पदाधिकार्यांनी मांडली असता प्रभारी गटशिक्षणाधिकारी वसावे आणि शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे यांनी रायगड जिल्हा परिषदेतून भोपळे व अन्य अधिकारी शिक्षण विभागातून येणार होते. मात्र, लोणेरे येथूनच ते काही महत्वाच्या कामासाठी पुन्हा जिल्हा परिषदेकडे रवाना झाल्याची माहिती दिल्याने मनसे आणि मनविसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले.
यावेळी जिल्हा मनसे सचिव अमोल पेणकर, पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर, शहरअध्यक्ष राकेश सलागरे, शहर उपाध्यक्ष प्रफुल्ल पांडे, मुश्ताक मुजावर, तुषार पवार, गणेश कासुर्डे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड आदींनी ठिय्या दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी वसावे यांना लेखी पत्र पाठवून येत्या 17 जानेवारीला भेटीची तारीख व वेळ निश्चित करण्याची ग्वाही दिली.