आदिवासी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन
| कोर्लई | वार्ताहर |
‘न्याय आपल्या दारी’ हा संदेश घेऊन मुरुडमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या निर्देशानुसार मुरुडमध्ये फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या न्यायालयाचा शुभारंभ सांगली येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, या फिरत्या लोकन्यालयात 24 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1 प्रकरण निकाली निघाले, तसेच यादिवशी मुरुड तालुका विधी सेवा समितीतर्फे तेलवडे येथे एनसीडब्ल्यू अंतर्गत आदिवासी महिलांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये, अॅड. मृणाल खोत, अॅड. मनाली सतविडकर, अॅड. अजित चोगले, सहा. सरकारी अभियोक्ता संजय राठोड, तेलवडे सरपंच श्रीमती पवार, उपसरपंच निलेश तांबडकर, ग्रामसेवक श्रीमती धुमाळ तसेच आदिवासी महिला उपस्थित होत्या.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अॅड. मृणाल खोत यांनी महिलांवर होणारे लैंगिक शोषण, पोटगीबाबतचे कायदे या विषयांवर, तर अॅड. मनाली सतविडकर यांनी विधी सेवा समितीतर्फे महिलांना मिळणारे फायदे, पोटगीबाबत व हुंडाबळी, त्याची शिक्षा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांनी आदिवासी महिलांना कायदे व विधी सेवा समितीतर्फे देण्यात येणार्या सुविधांबाबत महत्त्व पूर्ण मार्गदर्शन करून गृहोपयोगी वस्तूंचे कीट व अल्पोपहार देऊन शिबिराची सांगता करण्यात आली.