लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व श्री कृपा क्लिनिकचा अभिनव उपक्रम
। वावोशी । वार्ताहर ।
गावागावांत फिरत दृष्टीदान करणारा ‘डोळ्यांचा फिरता दवाखाना’ हा आरोग्यसेवेचा उपक्रम पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत रुजू झाला आहे. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व श्री कृपा क्लिनिक, डोणवत (ता. खालापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला हा उपक्रम, छत्तीशी विभागातील ग्रामीण आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.
डॉ. सुनील देवडीकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुषमा देवडीकर हे दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून खेडोपाड्यातील रुग्णांसाठी नि:स्वार्थपणे कार्यरत आहेत. त्यांच्या श्री कृपा क्लिनिकमधून अल्प दरात चांगली वैद्यकीय सेवा मिळत असल्याने डोणवत आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांचा मोठा आधार बनला आहे. या सेवाभावी कार्यात आता लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. सुहास हळदीपुरकर सहभागी झाले असून, एक अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज मोबाईल व्हॅनद्वारे डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदूचे निदान आणि अल्प दरात चष्मा वितरण या सुविधा ग्रामीण भागात पोहोचवल्या जात आहेत. या ‘फिरत्या दवाखान्याची’ सेवा दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी देण्यात येणार आहे.
उदघाटन प्रसंगी ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत मोठा प्रतिसाद दिला. लक्ष्मी आय हॉस्पिटलचे प्रतिनिधी मारुती गाडगे यांनी या उपक्रमातील डॉक्टर, नर्सेस आणि स्वयंसेवकांचे मनापासून आभार मानले. या टीममध्ये सीमा बेलोस्कर, अनिकेत सर, अभिनव सर, सलीम खान व श्री कृपा क्लिनिकच्या अमृता भगत यांचा मोलाचा सहभाग होता. ग्रामीण भागातील आरोग्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांची अत्यंत गरज असून, ‘डोळ्यांचा फिरता दवाखाना’ हा उपक्रम दृष्टीच नव्हे तर आशाही देणारा ठरत आहे.






