| पेण | प्रतिनिधी |
गुन्हे अन्वेषणाची गती वाढवण्यासाठी आणि गुन्ह्याच्या ठिकाणीच तात्काळ वैज्ञानिक पुरावे गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने पेण उपविभागीय पोलीस कार्यालयात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. पेणसह खालापूर आणि कर्जत परिसरात या व्हॅनद्वारे विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली असून गुन्हे शोधात मोठी मदत होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस कार्यालयाला एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार 7 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावे अति महत्वाची भूमिका बजावतात. यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांचा तपास जलद गतीने आणि वैज्ञानिक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, डिजिटल फॉरेन्सिक किट, पुरावे जतन व विश्लेषणासाठी विशेष साधने तसेच प्रशिक्षित पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या ठिकाणीच वैज्ञानिक तपासणी त्वरित सुरू करता येणे, पुरावे सुरक्षित ठेवणे आणि प्राथमिक निष्कर्ष मिळवणे यामुळे तपास प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी व्हॅनची पाहणी करून उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. रायगड पोलिसांच्या तपास यंत्रणेला बळकटी देणारी व आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसज्ज अशी ही फॉरेन्सिक व्हॅन गुन्हे अन्वेषणात नवे पर्व सुरू करणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
पेणमध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल
