। भंडारा । प्रतिनिधी ।
दुचाकीवरुन जाताना मोबाईलचा अचानक स्फोट होऊन एकाचा दुर्देवी मृत्यु तर एक जण जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. सुरेश संग्रामे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.
ही दुर्घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध इथे शुक्रवारी (दि. 06) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील सुरेश संग्रामे (वय 55) आणि नत्थु गायकवाड (56) हे दोघे नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडे निघाले होते. दरम्यान, सुरेश यांच्या शर्टच्या खिश्यात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे त्यांच्या कपड्यांना आग लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. तर, दुचाकीवर मागे बसलेले नथ्थू गायकवाड हे अचानक स्फोट झाल्याने गाडीवरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.