नागरिकांसह शासकीय कार्यालयांना फटका
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झालेले असतानाच आता भ्रमणध्वनी सेवाही खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. भारतीय संचार निगम मर्यादित सेवेबद्दल ग्राहकांच्या तक्रारी वाढत असतानाच आता खाजगी भ्रमणध्वनी कंपन्यांची सेवाही विस्कळीत होत आहे. ऐन पावसाळ्यात या समस्या निर्माण झाल्याने याचा फटका शासकीय कार्यालये तसेच नागरिकांना बसत आहे.
निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीवेळी भ्रमणध्वनी यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्याने रायगड जिल्ह्यात मोठी गंभीर समस्या निर्माण झाली होती. तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण अध्यक्ष महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात सेवा देणाऱ्या सरकारी व सर्व खाजगी भ्रमणध्वनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करीत येणाऱ्या काळात भ्रमणध्वनी सेवा ही अखंडित उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. श्रीवर्धन तालुक्यात सध्या भ्रमणध्वनीच्या खाजगी कंपन्यांची सेवा तसेच भारतीय संचार निगम मर्यादित या सेवा वारंवार पूर्ण ठप्प होत आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांनी भयानक नैसर्गिक आपत्तीला तोंड दिले आहे. भ्रमणध्वनी सेवा खंडित झाल्याने नागरिकांसह शासकीय यंत्रणेला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. आपतग्रस्ताने आपत्ती नियोजन कक्षाशी संपर्क साधल्यास त्याच तात्काळ मदत उपलब्ध होईल, असे शासकीय पातळीवरून सांगण्यात येते. परंतु, त्याकरिता भ्रमणध्वनी सेवा विनाखंड सुरू ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित कंपन्यांची आहे. जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेच्या माध्यमातून भ्रमणध्वनी सेवा अखंडित सुरू ठेवण्याची आवश्यक कार्यवाही होणे गरजेचे आहे.
खंडित वीजपुरवठ्याचा परिणाम
वीजपुरवठा खंडित झाल्यावर भ्रमणध्वनी सेवा तात्पुरती बंद पडू शकते. भ्रमणध्वनी टॉवरचा वीजपुरवठा खंडित झाल्यास तेथील बॅटरी किंवा जनरेटरद्वारे तात्पुरता वीजपुरवठा मिळतो, परंतु तो मर्यादित वेळेसाठीच असतो. यामुळे, वीजपुरवठा जास्त वेळ खंडित झाल्यास भ्रमणध्वनी सेवा खंडित होऊ शकते, अशी माहिती खाजगी भ्रमणध्वनी कंपनीमार्फत देण्यात आली आहे.







