। सुतारवाडी । वार्ताहर ।
गेल्या आठ दिवसापासून सुतारवाडी आणि अन्य परिसरामध्ये मोबाईलच्या रेंजची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांची कामे ठप्प झाली आहेत.
सुतारवाडी परिसरात पूर्वी बीएसएनएल डोकोमोची रेंज होती, त्यामुळे अनेक मोबाईल धारकांनी बीएसएनएल आणि डोकोमोचे सिम कार्ड टाकले होते. मात्र, काही महिने हे सिम कार्ड चालले त्यानंतर जिओने या ठिकाणी आपले बस्तान मांडले. जिओनेसुद्धा काही काळ आपली सेवा चांगली दिली त्यानंतर ही सेवासुद्धा आता कोळमळली आहे. त्यामुळे येथील परिसरातील त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सिम कार्डधारक वैतागले आहेत. आता नेमके कोणते सिम आपल्या मोबाईलमध्ये टाकावे या विवंचनेत सर्व ग्राहक आहेत. आणखी कोणते नवनवीन टॉवर या ठिकाणी होतील आणि सिम कार्ड टाकावे लागतील याबाबत सर्वत्र चर्चा चालू आहे.
सुतारवाडी हे गाव 16 वाड्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात अनेक फार्म हाऊस आहेत. या ठिकाणी अनेक देवाणघेवाणीचे व्यवहार होत असतात. मोबाईलचे रेंज नसल्यामुळे अनेकांना अडचण होत आहे. मात्र याकडे टॉवरधारक दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील मोबाईल सिम कार्ड धारकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्याचप्रमाणे बाहेरील नातेवाईकांना संदेश देण्यासाठी मोबाईल आवश्यक झाला आहे. मात्र मोबाईलची रेंज वारंवार जात असल्यामुळे येथील ग्रामस्थांना तसेच व्यापार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.