वाशी | प्रतिनिधी |
वाशी रेल्वे पोलिसांनी सराईत मोबाईल चोराला अटक केली. अमन सिंग (वय 27) असे त्याचे नाव असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मोबाईल चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यातदेखील त्याच्याविरोधात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक शाखेने चोरी झालेला मोबाईल ट्रेस केला. त्या माहितीच्या आधारे वाशी परिसरातून जिगर आलम (वय 21) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला. जिगरकडे चौकशी केली असता त्याने हा मोबाईल अमन या मित्राकडून घेतल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे अमनचा मोबाईल ट्रेस करून शोध घेण्यात आला. अखेर त्याला बुधवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली होती. पोलिसांनी या कोठडीदरम्यान केलेल्या चौकशीत त्याने आणखी तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याने चोरलेले एकूण चार मोबाईल पोलिसांनी जप्त केले.





