कर्जतमध्ये मोबाईल युनिट आरोग्य सेवा सुरु

2018 मध्ये बंद झाली होती योजना
आदिवासीवाडीत जाऊन केले जातात उपचार
| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत फिरता दवाखाना चालवला जायचा. मात्र त्या मोबाईल युनिट मधील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांचे पगार थकल्याने 2018 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील मोबाईल युनिट बंद करण्यात आले होते. मात्र आता राष्ट्रीय आरोग्य अभियान ने कर्जत तालुक्यासाठी हे युनिट सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कशेळे येथे मुख्यालय असलेला फिरता दवाखाना सुरु करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहेत, परंतु दहा दिवस लोटले तरी फिरता दवाखाना सुरु झालेला नाही.

राज्य सरकारने आदिवासी भागाला रुग्णसेवा देण्यासाठी नॅशनल मोबाईल युनिट 2012 मध्ये कार्यान्वित केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून चालविली जाणारी नॅशनल मोबाईल रुग्णवाहिका रायगड जिल्ह्यात कर्जत तालुकयातील आदिवासी भागात चालविली जाते. 2012 मध्ये आलेल्या दोन्ही रुग्णवाहिका आता नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे त्या गाड्या जंगल भागात कुठे बंद पडत होत्या. मात्र त्या रुग्णवाहिका साठी नेमण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि अन्य कर्मचारी वर्गाने त्याही स्थितीत काम केले. मात्र एप्रिल 2018 पासून या युनिटची जबाबदारी पुणे येथील शतायुषी फाउंडेशनला दिली. पण पहिल्या दिवसापासून या संस्थेने औषध पुरवठा पूर्ण महिन्याचा पुरविला नाही. आठ दिवसाला पुरेल एवढा औषध साठा संपल्यानंतर गाडी फिरत होती, रुग्णांना तपासात होती, पण औषध पुरवठा करीत नव्हती. त्यानंतर त्या दोन्ही रुग्णवाहिका अधिकारी आणि कर्मचारी यांना राज्यात फिरता दवाखाना संकल्पना राबविण्याचा ठेका घेणार्‍या शतायुषी संस्थेकडून पगार देणे बंद झाले आणि 2018मध्ये कर्जत तालुक्यातील आदिवासी लोकांचा आधार असलेली मोबाईल रुग्णवाहिका बंद झाल्या.

आदिवासी भागातील गावोगावी जावून रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा शासनाने बंद केली आहे.आता त्यांचे पाच महिन्याचे पगार थकले आहेत,मात्र शासनाने ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे याचा आनंद असून लवकरात लवकर मोबाईल युनिट ची व्यवस्था कार्यान्वित व्हावी.

– जैतू पारधी, आदिवासी कार्यकर्ते


आम्ही उपसंचालक यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील कशेळे येथे मोबाईल युनिट सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत. एक जुलै पासून मोबाईल युनिट कार्यान्वित करण्याच्या लेखी सूचना होत्या, ते का सुरू झाले नाही याची चौकशी केली जाईल.

– डॉ सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकार


Exit mobile version