सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकावर मॉक ड्रिल

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

मेट्रो स्थानकाचा ताबा घेणे, बॉम्ब ठेवल्याची धमकी आणि सुरक्षाविषयक आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 1 वरील सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशन येथे व्यापक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली. 20 मे रोजी पार पडलेल्या या विशेष सुरक्षा सरावामध्ये नवी मुंबई पोलिसांचे शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस अधिकारी, सिडको आणि महा मेट्रो प्रशासनाने संयुक्त सहभाग घेतला.

सिडको आणि महा मेट्रो यांच्या समन्वयातून घेण्यात आलेल्या या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश म्हणजे मेट्रो स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेची तयारी, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, प्रवासी निर्वासन प्रक्रिया, दळणवळण व्यवस्था आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची कार्यक्षमता तपासणे हा होता.

मॉक ड्रिलदरम्यान स्थानकावर अनधिकृतरीत्या ताबा घेण्याचा प्रयत्न आणि स्फोटक वस्तू ठेवल्याचा संशय अशा गंभीर परिस्थितीचे वास्तवदर्शी सादरीकरण करण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती जाहीर होताच प्रशिक्षित जवानांनी तत्काळ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढणे, स्थानक विलगीकरण करणे, संशयित वस्तूंची तपासणी, गर्दी नियंत्रण आणि समन्वित सुरक्षा कारवाई सुरू केली.

या ड्रिलमध्ये पोलीस कर्मचारी, मेट्रो कर्मचारी आणि क्यूआरटी टीमने जलद हालचाल, अचूक समन्वय आणि तत्पर प्रतिसादाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये आपत्कालीन दळणवळण प्रणाली सक्रिय करणे, प्रवेश नियंत्रण उपाययोजना राबविणे तसेच वैद्यकीय आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांशी समन्वय साधण्याचाही समावेश होता.

याप्रसंगी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारी, क्यूआरटी टीमचे सदस्य, सिडको आणि महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सहभागी पथकांच्या व्यावसायिक कौशल्याचे आणि तात्काळ प्रतिसाद क्षमतेचे कौतुक केले. या मॉक ड्रीलमुळे सुरक्षाविषयक कार्यकारी सिद्धतेची चाचणी घेण्याबरोबरच भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रवासी आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना अधिक सक्षम करण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

मेट्रो प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आणि संभाव्य सुरक्षाविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी अशा प्रकारच्या मॉक ड्रिल अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Exit mobile version