कोरोनाच्या धास्तीने आरोग्य यंत्रणेचे मॉकड्रील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कोरोनाच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे मॉकड्रील घेण्यात आले. तसे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले होते.

जगातील विविध देशात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्याचं चित्र आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया यासारख्या देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. भारतात देखील कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट बीएफ 7 चा प्रसार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोना या विषाणूच्या नव्या व्हेरिएन्टचा धोका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोविड परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलिमेडिसिन सुविधा सुसज्ज असल्याबाबत खातरजमा करण्यासाठी मॉकड्रील घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे दि. 26 आणि 27 डिसेंबरला मॉकड्रील घेण्यात आले आहे.

मॉकड्रील झालेल्या आरोग्य संस्थांमधील रुग्णालयीन यंत्रणा, यंत्रसामुग्री, औषधे, मनुष्यबळ, प्रशिक्षण, संदर्भसेवा, टेलिमेडिसिन सुविधा ई. बाबतची माहिती covid19.nhp.gov.in या पोर्टलवर नोंद करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे आयसोलेशन बेड 791, ऑक्सिजन बेड 695, आयसीयु /व्हेंटिलेटर बेड 157 उपलब्ध आहेत तसेच औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे मॉकड्रीलच्या माध्यमातून सांगण्यात आले.

Exit mobile version