गद्दाराकडून कोळी समाजाची थट्टा; आमदारांची भरसभेत जीभ घसरली

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील कोळी समाज हा जीवावर बेतून कुटुंबाचा गाडा हाकत आहे. सरकारकडून मिळणार्‍या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत. डिझेल परतावा, जाळ्यासाठी अनुदान, बोटीची देखभाल, दुरुस्तीसाठी पाठबळ नसतानाही ते जीवाशी  खेळायचे आव्हान स्वीकारुन उदरनिर्वाह करतात. त्यांचे जिल्ह्याच्या जडणघडणीतही अमूल्य योगदान आहे. असे असताना शिंदे गटाचे आ. महेंद्र दळवी यांनी रामराज येथील सभेत कोळी बांधवांची केलेली थट्टा त्यांच्या चांगलीच अंगाशी येणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. छोटमला त्यांच्या कार्यकर्त्यांसह परत होडीवर पाठवतो, तो तांडेल आणि कार्यकर्ते खलाशी, असे बोलत समाजाची टिंगल केली.

अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी दळवींच्या निष्क्रियतेचा पाढाच वाचला. तसेच, त्यांच्या बगलबच्चांचाही खरपूस समाचार घेतला होता. भोईरांनी काढलेला चिमटा चांगला जिव्हारी लागल्याने दळवींनी रामराज येथील सभेत भोईरांवर टीकास्त्र सोडले. मात्र, हे करीत असताना त्यांनी कोळी समाजाच्या भावना दुखावल्या. कोळी बांधवांच्या मासेमारी व्यवसायाची त्यांनी भरसभेत थट्टा केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोळी बांधवांच्या उपस्थितीत स्वराज्याच्या व भारताच्या इतिहासातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच पेशव्यांनीही कोळी बांधवांमधील धैर्य, काटकपणा आणि प्राणपणाला लावण्याची वृत्ती ओळखून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये सहभागी करून घेतले होते. असे असताना कोळी समाजाची त्यांच्या व्यवसायाची थट्टा करुन राजकारण करणे चुकीचे असल्याची भावना कोळी बांधवांनी व्यक्त केली आहे.

बदला घेणार
राजकीय व्यासपीठावर एखाद्या समाजाची टिंगल करणे आ. दळवींना चांगलेच भोवणार असून, येत्या निवडणुकीत कोळी बांधव याचा बदला घेणार असल्याची चर्चा कोळी बांधवांमध्ये सुरु आहे. केवळ सत्तेसाठी दळवींनी मासेमारी व्यवसायाला हिणवलं असून, लवकरच मतपेटीत त्यांना त्यांची योग्य जागा दाखविणार असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

आमदारांनी आमच्या कोळी समाजाची इज्जत काढली आहे. त्यांनी असं बोलायला नको होते. आमदार आम्हाला काय कमी लेखतात का? आम्ही आमच्या मेहनतीने धंदा करतो. आम्ही कोणाची चाकरी करीत नाही. आमदारांनी असे शब्द वापरणे चुकीचे आहे.

मनोहर बैले, उपाध्यक्ष,
रायगड जिल्हा मच्छिमार संघ

बेताल वक्तव्य करुन आमदार महेंद्र दळवी यांनी कोळी समाजाची थट्टाच केली आहे. कोळी बांधवांचा आमदारांनी अवमान केला आहे. कोळी लोकांनी काय मोठे होऊच नये का? तुम्ही आपापसातील उणीधुणी काढत बसा, आम्हाला काहीच देणे-घेणे नाही. परंतु, आमच्या समाजाला बदनाम करु नका. आमदारांच्या या वक्तव्याचा मी संपूर्ण कोळी समाजाच्यावतीने निषेध करतो.

विजय गिदी, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ मुंबई
Exit mobile version