| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यामध्ये हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर कायमच राहिला आहे. नद्या, विहिरी, तलाव, धरणे पाण्याने भरून गेली आहेत. अनेक सखल भागात पाणी साचल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असून, सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहनांचादेखील वेग मंदावला असून, इच्छित स्थळी अर्धा ते एक तास उशिरा पोहोचत आहेत. दरम्यान, आतापर्यंत रायगडात 127 टक्के (346 मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यामध्ये 24 जूनपासून पाऊस सुरु झाला. या पावसात लघुपाटबंधारे विभागातील 28 धरणांपैकी 11 धरणे फुल्ल झाली आहेत. जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील अंबा नदीमध्ये 5.90 मी., कुंडलिका 22.90 मी., खालापूरमधील पाताळगंगा नदीमध्ये 19.30 मी., कर्जतमधील उल्हास नदीमध्ये 45.5 मी., पनवेलमधील गाढी नदीमध्ये 2.55 मी., इतका जलसाठा असूर्नें या नद्यांच्या पाण्याची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. पाऊस असाच सुुरु राहिल्यास कुंडलिका, पाताळगंगा या दोन नद्या इशारा पातळी ओलांडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील सात, पनवेलमधील तीन, म्हसळामधील 22, तळामधील दोन, रोहामधील सात, महाडमधील तीन, उरणमधील दोन व सुधागडमधील एक असे एकूण 47 घरांची पडझड झाली आहे. तसेच म्हसळामधील दोन समाजमंदिरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पेण व मुरुड तालुक्यातील खाडीलगत, दरडग्रस्त गावे, वाड्यांमधील 62 कुटुंबांतील 243 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. त्यात पेणमधील खाडीलगत असलेले सागरीवाडी, अष्टविनायक वाडी, विठ्ठलवाडी या गावांतील 47 कुटुंबांतील 185 नागरिकांना तसेच दुरशेत या दरडग्रस्त गावातील सहा कुटुंबांतील 18 नागरिकांना नातेवाईकांकडे स्थलांतरीत केले आहे. तसेच मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील दरडग्रस्त गावातील नऊ कुटुंबांतील 40 नागरिकांचे जिल्हा परिषद शाळेत व नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे.
तीन दिवस यलो अलर्ट
रायगड जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत तीन दिवस यलो अलर्ट हवामन विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. आठ जुलैपासून या तीन दिवसाच्या कालावधीत जोरदार व हलक्या स्वरुपात पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. दरडग्रस्त, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.