सरपंच हर्षदा मयेकर यांच्या प्रयत्नांना यश
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माध्यमातून आधुनिक फॅब्रिकेटेड शौचालय व बाथरूम सुविधा उभारण्यात आली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रत्येकी चार सीटची व्यवस्था असलेल्या या सुविधेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे नागावच्या पर्यटनविकासाला नवी चालना मिळणार आहे.
नागाव समुद्रकिनारी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून आणि पुढाकारातून ही सुविधा उपलब्ध झाली आहे. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, सौंदर्य आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहेत. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निखिल मयेकर, उपसरपंच मंगला नागे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका काटे, निकिता पाडेकर, वीणा पिंपळे यांच्यासह ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
हर्षदा मयेकर
नागाव समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. नव्याने उपलब्ध झालेली शौचालय व बाथरूम सुविधा पर्यटनविकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्र पर्यटन विभाग, जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीच्या समन्वयातून भविष्यातही नागावमध्ये अधिकाधिक पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
सरपंच
