| मुंबई | प्रतिनिधी |
मुस्लिमांशी आपले नाते घट्ट आहे व मतांसाठी आपण काम करत नाही, असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर व मुस्लिम द्वेषावर भाषण केले. देशातील जनता मोदींच्या थापेबाजीला बळी पडणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी स्पष्ट केले.
कल्याण येथे मोदींची प्रचारसभा झाली. सभेतील भाषणावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत मोदी बिनबुडाचे आरोप करत आहेत. मुस्लिमांना संपत्ती वाटणार हे जाहीरनाम्यात कुठेच नाही. असे असतानाही काँग्रेस मुस्लिमांना संपत्ती वाटणार असा अपप्रचार मोदी करीत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. आरक्षणाला आरएसएसफ व भाजपचाच विरोध आहे. हे उघड असताना काँग्रेस एएसी, एसटी व ओबीसींचे आरक्षण काढून मुस्लिमांना देणार असा अपप्रचार करीत आहेत.
पुढे म्हणाले, भाजपच्या पराभवाची चिंता करावी, काँग्रेस विरोधी पक्षही बनू शकणार नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकली असेल तर या पक्षांची एवढी चिंता करण्याची मोदी यांना काय गरज आहे? वास्तविक पाहता भारतीय जनता पक्षाचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव होईल, या चिंतेने त्यांची झोप उडाली आहे. या भीतीपोटी ते काहीही बोलत आहेत. काँग्रेसचे दुकान बंद होण्याची चिंता करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी त्यांची व भाजपच्या पराभवाची चिंता करावी, असेही नाना पटोले म्हणाले.