सर्वपक्षीय बैठकीलाच मोदींची दांडी; विरोधक संतप्त

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सोमवारपासून सुरु होणार्‍या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेचा अजेंडा काय असेल यासाठी केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दांडी मारली.रविवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षांचे मल्लिकार्जुन खर्गे, अधिर रंजन चौधरी आणि आनंद शर्मा हे काँग्रेसकडून तर सुदिप बॅनर्जी आणि देरेक ओब्रियन हे तृणमूल काँग्रेसकडून तर टीआर बाळू आणि टी. सिवा डीएमकेकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार उपस्थित होते. मोदींच्या अनुपस्थितीबद्दल खर्गे म्हणाले, आम्हाला आशा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला हजर राहतील. पण काही कारणांमुळे ते हजर राहू शकले नाहीत. सरकारनं कृषी कायदे मागे घेतले पण पतंप्रधानांनी हे जाहीर करताना म्हटलं होतं की, आम्ही या कायद्याचं महत्व शेतकर्‍यांना समजावून सांगू शकलो नाही. त्यामुळं हेच कायदा भविष्यात पुन्हा वेगळ्या मार्गाने पुन्हा आणले जाऊ शकतात. यावेळी विरोधकांनी मागणी केली की, ज्या घरामध्ये कोविडच्या काळात प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला, अशा पीडितांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच यावेळी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, 31 पक्ष आणि 42 नेते या सर्वपक्षीय बैठकीला हजर झाले होते. लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिली तर सरकार कुठल्याही प्रश्‍नावर चर्चेसाठी तयार आहे.

आज कृषी कायदा रद्दचे विधेयक
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांच्या नजरा या कृषी कायदे रद्द केल्याच्या निर्णयाकडे आहे. याद्वारे गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. विरोधकांनी देखील यावर चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. सरकारनंही सांगितलंय की, अधिवेशन सुरु होताच पहिल्याच दिवशी याला मंजुरी दिली जाईल.या अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीबाबतही चर्चा होणार आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी सदस्यांना व्हीप जारी करण्याात आला आहेत. इतर कामकाजाच्या नियोजनाबाबत संसदीय कामकाज समितीची वेगळी बैठक होणार आहे. संसदेचं हे अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला सोमवारी सर्व सदस्यांशी चर्चा करणार आहेत.

Exit mobile version