संजय राऊत यांना विश्वास
| मुंबई | वृत्तसंस्था |
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष 220 ते 230 चा आकडा ओलांडणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, ही आमची हमी आहे. दिल्लीत महाराष्ट्राची अवस्था पायपुसण्यासारखी झाली आहे. राज्यकर्ते मूग गिळून गप्प आहेत. काही लोक मोदींना शिवाजी महाराज म्हणायला लागले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपचे कंत्राटी कामगार आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लोकाधिकार अधिवेशनाच्या व्यासपीठावर बोलत होते.
महाराष्ट्रात दोन लोकांनी भूमिपूत्रांसाठी लढा सुरु केला. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून शिवसनेची स्थापना झाली. आपल्याला घाटी म्हणून हिणवले गेले. याच मराठी माणसाने मुंबई टिकवली. मराठी माणसाला नोकऱ्या हव्या आहेत. खोटी आश्वासनं द्यायला बाळासाहेब ठाकरे हे काही मोदी नव्हते. पंतप्रधान मोदी 2014 पासून सांगतायत की, वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ. मग आतापर्यंत 20 कोटी नोकऱ्या व्हायला पाहिजे होत्या. मात्र, आता मोदी सांगतात की पकोडे तळा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी लोकाधिकार अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदी-शाह यांना वाटायला लागलं आहे की, आपल्याला पुन्हा तेवढ्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे ते अनेक घोषणा करत आहेत. आपणही त्यांच्या आहारी जात आहोत. भाजप हा फक्त उत्तर भारतीय पक्ष आहे. दक्षिणमध्ये त्यांना कुठेच स्थान नाही. मग भाजप कशाच्या जोरावर राष्ट्रीय पक्ष असल्याचा दावा करतो, असा सवाल केतकर यांनी केला. गुजराती मंत्री कसा अपमान करतात आणि मराठी माणसाकडे कसे तुच्छतेने पाहतात, याचा अनुभव आम्ही संसदेत दररोज घेतला आहे. आम्हाला भाजपचे अनेक खासदार भेटतात. ते सांगतात की, आमच्यावरही ईडीची नजर आहे. वेळ आली तर हे खासदार मोदी आणि शाह यांच्याविरोधात उभे ठाकतील. ते म्हणतात की, तुम्ही विरोधी पक्षाचा रीच वाढवा, त्याचा फायदा आम्हालाच होईल, असे केतकर यांनी सांगितले.